तीन वर्षांपूर्वी देशात करोनानं थैमान घातलं होतं. या काळात आरोग्य यंत्रणेपासून प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत सर्वांवरच प्रचंड मोठं दडपण, जबाबदारी आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळत होतं. या काळात प्रत्येकजण आपापल्या परीने करोनाचा सामना करण्याचा प्रयत्न करत होता. सर्व राज्य सरकारे व केंद्र सरकारही यासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारे लढा देण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून देशवासीयांना थाळ्या वाजवण्याचं, टाळ्या वाजवण्याचं किंवा दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. यावर त्यावेळी बरीच चर्चाही झाली होती. त्याचं कारण मोदींनी स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संवाद साधला. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, एआय अशा मुद्द्यांसह करोना काळातील व्यवस्थापनावरही मोदींनी भाष्य केलं. करोना काळात भारतातील परिस्थितीचं नियोजन कसं केलं? अशी विचारणा बिल गेट्स यांनी केली असता मोदींनी त्याच्या उत्तरादाखल त्यावेळी कोणत्या धोरणाने मार्गक्रमण केलं, याविषयी माहिती दिली.

“तेव्हा मी स्वत: सगळे नियम…”

“मी करोना विषाणूविरोधातली लढाई आपल्या सगळ्यांची आहे यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यावर भर दिला. ही लढाई ‘विषाणू विरुद्ध सरकार’ अशी नसून ती ‘आपलं आयुष्य विरुद्ध विषाणू’ अशी लढाई आहे ही माझी भूमिका होती. त्याशिवाय मी पहिल्या दिवसापासून देशातील सगळ्यांशी चर्चा करत होतो. मी स्वत: सगळे नियम पाळून त्यातून लोकांसमोर उदाहरण ठेवलं”, असं मोदी बिल गेट्स यांना म्हणाले.

टाळ्या..थाळ्या…दिवे!

दरम्यान, यावेळी मोदींनी त्यांच्या थाळीनाद किंवा दिवे लावण्याच्या आवाहनाबाबत भूमिका स्पष्ट केली. “मी तेव्हा सांगितलं टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा. आमच्या देशात यावर चेष्टा-मस्करी करण्याचा प्रयत्न झाला. पण मला लोकांना विश्वासात घ्यायचं होतं की आपल्याला ही लढाई एकत्र लढायची आहे. तेव्हा हा विश्वास निर्माण झाला की आपल्याला आपलं आयुष्य वाचवतानाच इतरांचं आयुष्य वाचेल यासाठीही प्रयत्न करायचे आहेत. मग ती एक प्रकारे व्यापक चळवळ झाली. त्यामुळे नंतर मी देशवासीयांना जे काही सांगायचो, त्याचा स्वीकार व्हायचा. मला कुणी विचारायचं नाही की मास्क लावायला पाहिजे की नाही”, असं मोदी म्हणाले.

Video: “आपण एआयशी स्पर्धा करायला हवी, त्याला सांगायला हवं की…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बिल गेट्स यांच्याशी AI वर संवाद!

“माझ्या आईचं वय तेव्हा ९५ वर्षं होतं!”

“बळाचा वापर करून काम होत नाही. तुम्ही लोकांना माहिती द्या, त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांना सोबत घेऊन चला. हा माझा मोठा उपक्रम होता. त्यामुळे मला लसीकरणात मोठी मदत झाली. कुणीही मला थांबवलं नाही. आर्थिकदृष्ट्या मला अनेक समस्या आल्या. कारण मला लस बनलण्यासाठी संशोधन करायचं होतं. त्यानंतर लोकांना विश्वास द्यायचा होता की ही लस काम करेल. मग मी स्वत: लस घ्यायला गेलो. माझ्या आईचं तेव्हा ९५ वय होतं. त्यांनीही जाहीरपणे लस घेतली. यातून मी लोकांसमोर उदाहरण ठेवलं. मग लोकांचा यावर विश्वास बसला”, असं मोदींनी बिल गेट्स यांना या संवादादरम्यान सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi bill gates interview speaks on corona vaccination period pmw