पीटीआय, पुर्णिया
‘‘काँग्रेसने बिहारी जनतेची तुलना बिडीशी करून त्यांचा अपमान केला आहे,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता काँग्रेसला सडेतोड उत्तर देईल असे ते म्हणाले. बिहारच्या पूर्णिया येथे पंतप्रधानांच्या हस्ते ३६ हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाउभारणी आणि उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले.
तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांवर केंद्र सरकारच्या जीएसटी धोरणावर टीका करण्यासाठी केरळ काँग्रेसने समाजमाध्यमावर एक पोस्ट केली होती. मात्र, त्याचा अर्थ ‘बिहार बिडीबरोबर’ असा होत होता. त्यावरून वाद उद्भवल्यानंतर केरळ काँग्रेसने ती पोस्ट डिलिट केली. त्याच मुद्द्यावरून मोदींनी सोमवारी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला.
काँग्रेस आणि राजदच्या काळात राज्यात वाईट शासन होते अशी टीका मोदींनी केली. विरोधी पक्ष बिहारमध्ये घुसखोरांना अभय देत असून रालोआ सरकार त्यांना बाहेर काढेल असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. बिहारने देशाच्या विकासात,नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रालोआबरोबरच राहणार आहोत असे सांगितले.
कोट्यवधींच्या प्रकल्पांना सुरुवात
पंतप्रधान मोदी यांनी पूर्णिया जिल्ह्यात ३६ हजार कोटी रुपयांचे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच त्यांनी पूर्णिया विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन करताना पूर्णिया-कोलकाता मार्गावरील विमानाला हिरवा झेंडा दाखवला. या टर्मिनलमुळे पूर्णिया विमानतळाची प्रवासीक्षमता वाढणार आहे. मोदींनी भागलपूर जिल्ह्यात २५ हजार कोटी रुपयांच्या औष्णिक विद्याुत प्रकल्पांचा शिलान्यास केला.
राजद आणि काँग्रेसच्या कुशासनामुळे बिहारने बराच त्रास सहन केला आहे. त्यांना राज्याचा विकास सहन होत नाही. माताभगिनी विरोधकांना निवडणुकीत योग्य उत्तर देतील.– नरेंद्र मोदी, पंतप्रधान