Lok Sabha Session Updates: लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर नव्या सरकारचं पहिलंच अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित असताना सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण होताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी बोलताना एकीकडे विरोधकांकडून सहकार्य आणि जबाबदार वागणुकीची अपेक्षा ठेवली असताना दुसरीकडे त्यांनी आणीबाणीचा उल्लेख करत काँग्रेसवर टीकास्र सोडलं आहे. तसेच, देशाला संसदेत घोषणाबाजी नकोय, असंही मोदी यावेळी म्हणाले.

१८व्या लोकसभेच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होत असून ४ जुलैपर्यंत हे अधिवेशन चालेल. त्यानंतर ते स्थगित होऊन दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा २२ जुलैपासून सुरू होईल. तेव्हा देशाचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल. मात्र, त्याआधी नव्या खासदारांचा शपथविधी, राष्ट्रपतींचं अभिभाषण आणि त्यावर पंतप्रधानांचं उत्तर, खासदारांची भाषणं असा भरगच्च कार्यक्रम संसदीय अधिवेशनात असेल. अधिवेशनाच्या सुरुवातीला प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ५० वर्षांपूर्वीच्या आणीबाणी कालखंडाचा उल्लेख करत काँग्रेसला लक्ष्य केलं.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधानांनी यावेळी आणीबाणीच्या ५० वर्षांचा उल्लेख केला. “आज आपण २४ जूनला भेटत आहोत. उद्या २५ जून आहे. २५ जूनला भारताच्या लोकशाहीवर काळा डाग लागला होता, त्याला ५० वर्षं पूर्ण होत आहेत. भारताची नवीन पिढी ही बाब कधीच विसरणार नाही की भारताच्या संविधानाला तेव्हा पूर्णपणे नाकारलं गेलं होतं. देशाला तुरुंग करून टाकलं होतं. लोकशाहीला दाबून टाकलं होतं. आज देशातले नागरीक संकल्प करतील की ५० वर्षांपूर्वी केली गेलेली कृती पुन्हा करण्याची भारतात कधी कुणी हिंमत करणार नाही . आपण जिवंत लोकशाहीचा संकल्प करूयात”, असं मोदी म्हणाले.

विरोधकांना दिला खोचक सल्ला

दरम्यान, यावेळी मोदींनी विरोधी पक्षांना संसदेत योग्य वर्तन ठेवण्याचा खोचक सल्ला दिला. “देशाच्या जनतेला विरोधी पक्षांकडून योग्य पावलं टाकली जाण्याची अपेक्षा आहे. आत्तापर्यंत बरीच निराशा झाली आहे. पण कदाचित या १८व्या लोकसभेत विरोधी पक्ष देशाच्या सामान्य नागरिकांच्या भूमिकांचा योग्य सन्मान राखतील अशी अपेक्षा आहे. विरोधक लोकशाहीचं पावित्र्य जपतील अशी अपेक्षा मी ठेवतो”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

वादळी चर्चेची चिन्हे; १८व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून, विरोधकांचं संख्याबळ वाढल्याने सरकारची परीक्षा…

“सामान्य व्यक्तीच्या अपेक्षा असतात की संसदेत चर्चा व्हावी. लोकांना ही अपेक्षा नाहीये की संसदेत नखरे व्हावेत, ड्रामा होत राहावा. लोकांना सबस्टन्स हवाय, स्लोगन नकोय. देशाला एका चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे. मला विश्वास आहे की १८व्या लोकसभेत आपले खासदार सामान्य माणसाच्या या अपेक्षांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतील”, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.