Manmohan Singh Passed Away : देशाच्या आर्थिक सुधारणांचे जनक आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. सिंग यांची ज्येष्ठ कन्या उपिंदर सिंग यांनी मुखाग्नी दिला. या प्रसंगी राजकीय मतभेद बाजूला ठेवून विविध राजकीय पक्षांचे नेते अंत्यविधीसाठी उपस्थित राहिले. त्यांच्यावर अंत्यविधी झाल्यानंतर काँग्रेसने आता सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सरकारने डॉ. मनमोहन सिंग यांचा आदर ठेवला नाही, असं म्हटलं गेलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसने म्हटलंय की, “मनमोहन सिंग यांचा अपमान करणारे लोक आता त्यांच्या अस्थी विसर्जनावरूनही घृणास्पद राजकारण करत आहेत. कुटुंबाची गोपनियता जपण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी निवडण्यासाठी आणि विसर्जित करण्यासाठी कुटुंबासोबत गेले नाहीत. पण त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीत त्यांना असं समजलं की अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या कुटुंबीयांची कोणतीही गोपनियता जपली गेली नाही. तसंच, चितास्थळावर काही लोक पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना फूल निवडण्यासाठी आणि अस्थी विसर्जनासाठी त्यांची गोपनियता त्यांना देणं योग्य राहील. या गोष्टी कुटुंबासाठी भावनिक असतात.” यासंदर्भात पवन खेरा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांची पत्नी गुरशरण सिंग, तीनही मुली उपिंदर सिंग, दमन सिंग व अमृत सिंग यांच्यासह सिंग यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. लष्कराच्या तोफगाडीतून डॉ. सिंग यांचे पार्थिव निगमबोध घाट स्मशानभूमीत आणले गेले. तिन्ही सैन्यदलांनी २१ तोफांची सलामी दिली. त्यानंतर धार्मिक विधींसह शासकीय इतमामात डॉ. सिंग यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. डॉ. सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी निगमबोध घाटावर उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिंग यांच्या कुटुंबाने भेट घेतली.

हेही वाचा >> Manmohan Singh : “त्यांना टीव्हीदेखील चालू करता येत नव्हता”, मनमोहन सिंग यांच्या आजारपणाबाबत मुलगी दमन सिंग यांच्या पुस्तकात उल्लेख!

काँग्रेस कार्यकर्त्यांचा निरोप

डॉ. सिंग यांचे पार्थिव मोतिलाल नेहरू मार्गावरील निवासस्थानातून अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्यालयात सकाळी सव्वानऊच्या सुमारास आणले गेले. तिथे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले पी. चिदम्बरम, सलमान खुर्शीद, सुशीलकुमार शिंदे, मनीष तिवारी आदी ज्येष्ठ नेत्यांनी आदरांजली वाहिली. काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मनमोहन सिंग यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. काँग्रेस मुख्यालयात जय्यत तयारी करण्यात आली होती. दोन्ही बाजूला मोठे फलक, काँग्रेसचे ध्वज लावण्यात आले होते. मोठ्या संख्येने होणारी कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेऊन मुख्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics continues even over the burial of manmohan singhs ashes sgk