पीटीआय, नवी दिल्ली
शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये ‘स्मार्ट ब्लॅकबोर्ड’, ‘स्मार्ट वर्गखोल्या’ आणि इतर आधुनिक सुविधांचे स्वत:चे एक महत्त्व आहे. परंतु ‘स्मार्ट शिक्षक’ याहूनही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी केले. शिक्षकी पेशा हा आपल्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वपूर्ण काळ असल्याचेही त्यांनी या वेळी वर्णन करताना सांगितले.
शिक्षक दिनानिमित्त विज्ञान भवन येथे झालेल्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार समारंभात मुर्मू बोलत होत्या. अध्यापन आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल ६० हून अधिक शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘स्मार्ट ब्लॅकबोर्ड, स्मार्ट वर्गखोल्या आणि इतर आधुनिक सुविधांना स्वत:चे महत्त्व आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मार्ट शिक्षक, स्मार्ट शिक्षक म्हणजे असे शिक्षक जे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या विकासाच्या गरजा समजून घेतात. स्मार्ट शिक्षक प्रेम आणि संवेदनशीलतेने अभ्यास मनोरंजक आणि प्रभावी बनवतात. असे शिक्षक विद्यार्थ्यांना समाज आणि राष्ट्राच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम बनवतात. समजूतदार शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे काम करतात,’ असे राष्ट्रपती मुर्मू या वेळी म्हणाल्या. एका चांगल्या शिक्षकाकडे भावना आणि बुद्धिमत्ता दोन्ही असतात. भावना आणि बुद्धिमत्तेचा समन्वय विद्यार्थ्यांवरही परिणाम करतो, असे मुर्मू म्हणाल्या.
पंतप्रधानांचा पुरस्कार विजेत्यांशी संवाद
पुरस्कारांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधला. स्वदेशी उत्पादनांचा प्रचार करणाऱ्या मोहिमांचे नेतृत्व करण्यासाठी आणि ‘मेक इन इंडिया’ , ‘व्होकल फॉर लोकल’ चळवळींना बळकटी देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.