राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचे उमेदवार असणारे यशवंत सिन्हा यांनी उद्धव ठाकरेंवर भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर दबाव असल्याने त्यांनी आपल्या जागी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला असं यशवतं सिन्हा गुवाहाटीत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. मी कोणत्या राजकीय पक्षाशी नाही, पण कदाचित केंद्र सरकारसोबत लढत आहे असंही यावेळी ते म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात आदिवासी समाजातील महिलेला संधी मिळाली असून, आपण त्यांना पाठिंबा दिल्यास आनंद होईल, असा प्रेमळ आग्रह शिवसेनेच्या आदिवासी नेत्यांनी, महिला पदाधिकाऱ्यांनी धरला होता. यामुळेच द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. हा निर्णय कोणत्याही राजकीय दबावापोटी घेतलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय पक्षातील नाराजी थांबवण्यासाठी प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिदें गटाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “आम्हाला अभिमान, त्यांनी…”

राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असून केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आरोप यशवंत सिन्हा यांनी केला आहे. ते म्हणाले की, “ईडीचा गैरवापर होत आहे. यंत्रणांचा वापर करत ते निवडून आलेली सरकारं पाडत आहेत”.

केंद्र सरकार राष्ट्रपती निवडणुकीआधी विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

“तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी मला पूर्णपणे समर्थन देत आहेत. आम आदमी पक्षही लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मला या सर्व गोष्टींची कल्पना आहे. विरोधकांच्या गोटातील फक्त एकच पक्ष एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे तो म्हणजे शिवसेना. तेलंगण राष्ट्र समिती विरोधकांच्या बैठकीत सहभागी नव्हते, तरीही मला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आमच्याकडे मोठा पाठिंबा आहे,” असं यशवंत सिन्हा म्हणाले आहेत.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षाच्या खासदारांची बैठक ‘मातोश्री’वर घेतली होती. त्यात शिवसेनेने भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका अनेक खासदारांनी मांडली होती. निर्णयाचे सर्वाधिकार ठाकरे यांना देण्यात आले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याचा कसलाही दबाव माझ्यावर नव्हता. कोणालाही पाठिंबा जाहीर करा, असं खासदारांनी मला सांगितलं होतं, असं स्पष्टीकरणही ठाकरे यांनी दिलं.

द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत नंदुरबारमधील विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, पालघरच्या निर्मला गावित अशा आदिवासी समाजात काम करणाऱ्या अनेक शिवसेना नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विनंती केली. मुर्मू यांच्या रूपात आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली असून आपण त्यांना पाठिंबा दिल्यास आनंद होईल, असा आग्रह या शिवसैनिकांनी केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्ष-आघाडी न पाहता व्यापक विचार करून पाठिंबा देणे ही शिवसेनेची परंपरा आहे. प्रतिभाताई पाटील यांना महाराष्ट्रातील उमेदवार म्हणून तर प्रणव मुखर्जी यांना त्यांचा राजकीय अनुभव, ज्ञान व देशपातळीवरील प्रतिमा लक्षात घेऊन शिवसेनेने पाठिंबा दिला होता. तीच परंपरा कायम ठेवत आता द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहता द्रौपदी मुर्मू या भाजपाच्या उमेदवार असल्याने त्यांना मी विरोध करायला हवा होता. पण, मी तेवढय़ा कोत्या मनाचा नाही, असेही ठाकरे यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Presidential election opposition candidate yashwant sinha says shivsena uddhav thackeray forced to support nda droupadi murmu sgy