शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात आदिवासी समाजातील महिलेला संधी मिळाली असून, आपण त्यांना पाठिंबा दिल्यास आनंद होईल, असा प्रेमळ आग्रह शिवसेनेच्या आदिवासी नेत्यांनी, महिला पदाधिकाऱ्यांनी धरला होता. यामुळेच द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. हा निर्णय कोणत्याही राजकीय दबावापोटी घेतलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी आम्ही एका महिला आदिवासी उमेदवाराला पाठिंबा दिला याचा अर्थ भाजपाला नाही असं विधान केलं आहे. यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, “नरेंद्र मोदींनी त्यांना उमेदवारी दिली आहे. आजपर्यंत एकही आदिवसी आणि विशेषकरुन महिला या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेली नाही. हा पाठिंबा कोणा एका व्यक्तीचा नसून, महाराष्ट्राच्या जनमताचं प्रतिक आहे. बाळासाहेब ठाकरे प्रसंगी एनडीएच्या बाहेर जाऊन मतदान करायचे. उद्धव ठाकरेंनी आज तो गित्ता गिरवला आहे, याबद्दल मला सार्थ अभिमान आहे”. शरद पवारांनीच नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यास मदत केली; केसरकरांचा मोठा दावा; म्हणाले “राज ठाकरेंच्या पाठीशीही…” भाजपाने राष्ट्रपती निवडणुकीसंबंधी चर्चा करण्यासाठी मित्रपक्षांची बैठक बोलावली असून त्यानिमित्ताने दीपक केसरकरही दिल्लीत पोहोचले आहेत. भाजपाकडून शिंदे गटाला अधिकृत मान्यता आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “महाराष्ट्रात चुकीचं पसरवलं जात आहे. मला अनेकांनी फोन करुन उद्धव ठाकरेंना दिल्लीत निमंत्रण का नाही असं विचारलं. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नेहमी मातोश्रीवर गेला आहे. मातोश्रीचा प्रतिनिधी कधीही राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासंबंधी बैठकीला गेलेला नाही. तीच महती कायम ठेवली पाहिजे असं मी मानतो”. आमचे खासदारही भाजपाला पाठिंबा देतील तेव्हा आम्ही एनडीएत सहभागी झालो असं म्हणू शकतो. महाराष्ट्राचा विधिमंडळ पक्ष भाजपासोबत गेल्याने आम्ही तांत्रिकदृष्ट्या एनडीएत सहभागी झालो आहोत असंही त्यांनी सांगितलं. भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा; राष्ट्रपतीपद निवडणूक : उद्धव ठाकरे यांची घोषणा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षाच्या खासदारांची बैठक ‘मातोश्री’वर घेतली होती. त्यात शिवसेनेने भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका अनेक खासदारांनी मांडली होती. निर्णयाचे सर्वाधिकार ठाकरे यांना देण्यात आले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याचा कसलाही दबाव माझ्यावर नव्हता. कोणालाही पाठिंबा जाहीर करा, असं खासदारांनी मला सांगितलं होतं, असं स्पष्टीकरणही ठाकरे यांनी दिलं. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत नंदुरबारमधील विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, पालघरच्या निर्मला गावित अशा आदिवासी समाजात काम करणाऱ्या अनेक शिवसेना नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विनंती केली. मुर्मू यांच्या रूपात आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली असून आपण त्यांना पाठिंबा दिल्यास आनंद होईल, असा आग्रह या शिवसैनिकांनी केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्ष-आघाडी न पाहता व्यापक विचार करून पाठिंबा देणे ही शिवसेनेची परंपरा आहे. प्रतिभाताई पाटील यांना महाराष्ट्रातील उमेदवार म्हणून तर प्रणव मुखर्जी यांना त्यांचा राजकीय अनुभव, ज्ञान व देशपातळीवरील प्रतिमा लक्षात घेऊन शिवसेनेने पाठिंबा दिला होता. तीच परंपरा कायम ठेवत आता द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहता द्रौपदी मुर्मू या भाजपाच्या उमेदवार असल्याने त्यांना मी विरोध करायला हवा होता. पण, मी तेवढय़ा कोत्या मनाचा नाही, असेही ठाकरे यांनी नमूद केलं. काँग्रेसची टीका भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शिवसेनेची भूमिका अनाकलनीय असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. हा निर्णय घेताना शिवसेनेने आमच्याशी चर्चा केली नाही, असंही थोरात यांनी सांगितलं.