Priyanka Gandhi Speech in Parliament: गांधी कुटुंबानं आपल्या सत्ताकाळात काय केलं किंवा काय नाही यासंदर्भात विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या टीका-टिप्पणीवर आज काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी उत्तर दिलं. पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूर यासंदर्भात लोकसभेतील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींनी आपल्या भाषणात सत्ताधारी भाजपा व मोदी सरकारला परखड सवाल केले. त्याचवेळी अमित शाह यांनी भाषणात केलेल्या टीका-टिप्पणीवरही त्यांनी भाष्य केलं.
“गृहमंत्र्यांनी राजीनामा सोडा, जबाबदारी तरी घेतली का?”
पहलगाम हल्ल्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य करताना प्रियांका गांधींनी केंद्रीय तपास यंत्रणांवरही आगपाखड केली. “आपली अशी एकही एजन्सी नाही जिला या हल्ल्याबाबत आधी माहिती मिळाली? पाकिस्तानमध्ये या हल्ल्याची योजना तयार झाली आणि आपल्याला माहितीच नाही? हे आपल्या यंत्रणांचं अपयश नाही का? टीआरएफबाबत सरकारला माहिती होती. त्यांनी लोकांना मारल्याचीही माहिती होती. पण तुम्ही या गटावर नजर ठेवली नाही. पहलगाम हल्ल्यानंतर आयबी प्रमुखांनी राजीनामा दिला का? गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का? राजीनामा सोडा, जबाबदारी तरी घेतली का?”, असा सवाल प्रियांका गांधींनी उपस्थित केला.
दरम्यान, यावेळी समोरच्या बाकांवर बसलेल्या काही सत्ताधारी खासदारांनी काँग्रेसच्या सत्ताकाळातील काही उदाहरणांवर बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रियांका गांधींनी त्यांना थांबवत त्यावर भाष्य केलं. “साहेब, हे बघा.. इतिहासाबद्दल तुम्ही बोला, मला वर्तमानाबद्दल बोलायचंय. तुम्हाला तर एक कारणच पाहिजे. लगेच पूर्ण कुटुंबाची नावं वाचून दाखवता. स्वत:ची जबाबदारी स्वत: घ्या. ११ वर्षांपासून तर सत्तेत तुम्ही आहात. काल गौरव गोगोईंनी त्यांच्या भाषणात गृहमंत्र्यांना विचारलं की हे हल्ले तुमची जबाबदारी नव्हती का? मी बघत होते की संरक्षण मंत्री डोकं हलवत होते. काही बोलले नाहीत, पण त्यांना आतून हे जाणवत असेल की होय, थोडी जबाबदारी होती. पण त्यावेळी गृहमंत्री मात्र हसत होते”, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.
२००८ मुंबई हल्ला आणि दहशतवाद्यांचा खात्मा
काही सत्ताधारी खासदारांनी आपल्या भाषणात २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा व तत्कालीन काँग्रेस सरकारचा उल्लेख केला. त्यावर प्रियांका गांधींनी तेव्हाच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनीही राजीनामा दिला होता, असं सांगितलं.
“सत्ताधाऱ्यांनी भाषणांत २००८ च्या मुंबई हल्ल्यांचा वारंवार उल्लेख केला. मनमोहन सिंग सरकारने काहीच केलं नाही असंही म्हणाले. पण जेव्हा तो हल्ला होत होता, तेव्हाच त्या दहशतवाद्यांना मारून टाकण्यात आलं होतं. एक वाचला होता, त्यालाही २०१२ मध्ये फाशी दिली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीवर राजीनामा दिला होता. देशाच्या गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला होता. जनतेप्रती ते उत्तरदायित्व होतं. या देशाच्या भूमीबद्दल उत्तरदायित्व होतं”, असं त्या म्हणाल्या.
“राजनाथ सिंह पुलवामा, पुरी व पठाणकोटच्या वेळी गृहमंत्री होते. आज ते संरक्षण मंत्री आहेत. आपले गृहमंत्री अमित शाह यांच्या नाकाखाली आख्खं मणिपूर जळून गेलं. दिल्लीत दंगली झाल्या. पहलगाममध्ये हल्ला झाला आणि आजही ते त्याच पदावर आहेत. का?” असा सवाल प्रियांका गांधींनी केला.