Rahul Gandhi On Parth Pawar Land Deal : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. कारण १८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींना खरेदी करून फक्त ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत थेट पंतप्रधान मोदींना सवाल विचारले आहेत. पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणावर मोदी गप्प का? असा थेट सवाल राहुल गांधींनी केला आहे.
राहुल गांधींनी काय म्हटलं?
“महाराष्ट्रात दलितांसाठी राखीव असलेली १८०० कोटी रुपयांची सरकारी जमीन एका मंत्र्यांच्या मुलाच्या कंपनीला फक्त ३०० कोटी रुपयांना विकण्यात आली. तसेच त्यावरील मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आलं, म्हणजे ही एक लूट आहे आणि नंतर कायदेशीर सूट. म्हणजे ‘मत चोरी’करून स्थापन झालेल्या सरकारची ही ‘जमीन चोरी’ आहे”, अशा शब्दांत राहुल गांधींनी टीका केली आहे.
“त्यांना माहिती आहे की कितीही लुटलं तरी मत चोरी करून पुन्हा ते सत्तेत परतणार आहेत. त्यांना ना लोकशाहीची काळजी आहे? ना लोकांची? ना दलितांच्या हक्कांची? तुम्हाला लोकशाहीची, जनतेची, दलितांच्या हक्कांची पर्वा नाही. मोदीजी तुम्ही यावर गप्प का आहात? कारण तुमतं सरकार दलित आणि वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या त्याच लुटारूंवरच टिकलं आहे”, अशा शब्दांत राहुल गांधींनी पार्थ पवार जमीन प्रकरणावरून थेट मोदींवर टीका केली आहे.
पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलत असताना पार्थ पवार यांच्या जनीन खरेदी प्रकरणावर भूमिका मांडली. ते म्हणाले की, “माध्यमांनी जे काही प्रकरण चालवले आहे. त्याची पूर्ण माहिती आता माझ्याकडे नाही. माझा त्या गोष्टीशी थेट किंवा दुरान्वयेदेखील संबंध नाही. ३५ वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता मला ओळखते. मी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेण्याचे ठरवले आहे. दोन-चार महिन्यांपूर्वी असे काहीतरी चालू असल्याचे माझ्या कानावर आले होते. कोणत्याही चुकीच्या गोष्टी करू नयेत, अशा सूचना मी दिल्या होत्या. पण मधल्या काळात काय झाले? मला माहीत नाही”, असे अजित पवार म्हणाले.
‘मी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारा माणूस’
“मी आजपर्यंत कधीही माझ्या जवळच्या किंवा दूरच्या नातेवाईकाला लाभ होईल, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले नाहीत. मी कधीही अधिकाऱ्यांना फोन करून काही आदेश दिलेले नाहीत. उलट यानिमित्ताने उपमुख्यमंत्री म्हणून मी सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगेन की, जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचे करत असेल किंवा नियमात न बसणारे काम करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नसेल. मी कायद्याच्या आणि नियमाच्या चौकटीत राहून काम करणारा माणूस आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं.
‘मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलत असताना या प्रकरणाची सखोल चौकशी करू असे म्हटले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “मघाशी कुणीतरी मला मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया दाखवली. मी म्हणेण मुख्यमंत्र्यांनी जरूर या प्रकरणाची चौकशी करावी. तो त्यांचा अधिकार आहे. त्यातील सत्यता पडताळून पाहणे, हे सरकारचे कामच आहे. पण मी अद्याप या प्रकरणाची माहिती घेतलेली नाही. उद्या माहिती घेऊन सायंकाळी याबाबत वस्तूस्थिती मी मांडेन.”
