देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि काँग्रेसकडून तयारी सुरु झाली आहे. भाजपाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून विरोधक एकत्र आले आहेत. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. २०२४ साली राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी ही घोषणा केली आहे. तसेच, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढण्याचे संकेतही राय यांनी दिले आहेत.

“राहुल गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. प्रियंका गांधी वाराणसीतून लढण्यास इच्छूक असतील, तर त्यांच्या विजयासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते जीव ओतून काम करतील. स्मृती इराणी १३ रुपयांमध्ये साखर होत्या. दिली का?” असा सवाल अजय राय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.

हेही वाचा : काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्या आमदारांना आता ‘घरवापसी’चे वेध

अमेठी मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. याच मतदारसंघातून यापूर्वी संजय गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. राहुल गांधी सलग तीन वेळा अमेठी मतदारसंघातून निवडून आले होते. पण, २०१९ साली स्मृती इराणी यांच्याबरोबर झालेल्या लढाईत राहुल गांधींचा ५५ हजार मतांनी पराभव झाला होता.

हेही वाचा : हरियाणातील जेजेपी पक्ष राजस्थानची विधानसभा निवडणूक लढवणार, काँग्रेसची अडचण वाढणार?

दरम्यान, २०१९ साली प्रियंका गांधी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात होतं. पण, शेवटच्या क्षणी अजय राय यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर, २०१४ सालीही अजय राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढली होती. त्या निवडणुकीत अजय राय यांचा पराभव झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi will contest the 2024 lok sabha elections from uttar pradesh amethi ajay rai ssa