जम्मू काश्मीरच्या गुरेज येथील प्रचारसभेत बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख करत मोठं विधान केलं आहे. पाकिस्तानने दहशतवाद बाजुला ठेऊन भारताशी मैत्री केली असती, तर भारताने त्यांना आयएमएफपेक्षा अधिक पैसा दिला असता, असे ते म्हणाले. तसेच पाकिस्तानबरोबर मैत्री करण्यासाठी भारताने केलेल्या विविध प्रयत्नांचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले राजनाथ सिंह?

“भारत सरकार जम्मू काश्मीरला विकासासाठी पैसे देते, तर पाकिस्तान त्यांना मिळत असलेल्या पैशांचा दुरुपयोग करत दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करतो. पाकिस्तान त्यांच्या देशात दहशतवादाचा कारखाना चालवतो. त्यासाठी इतर देशांकडून पैसे मागतो. भारताविरोधात दहशतवादाचा शस्त्र म्हणून वापर करणारा पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडला आहे. पाकिस्तानचे काही विश्वासू मित्र देशही त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. खरं तर पाकिस्तानने दहशतवाद बाजुला ठेऊन भारताशी मैत्री केली असती, तर भारताने त्यांना आयएमएफपेक्षा अधिक पैसा दिला असता”, अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी दिली.

हेही वाचा – Defence Minister Rajnath Singh: “तुम्ही आमचे आहात, पाकिस्तान तुम्हाला…”, पीओकेमधील नागरिकांना राजनाथ सिंहाचे भारतात येण्याचे आवाहन

“पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाला प्रोत्साहन दिले”

पुढे बोलताना पाकिस्तानशी मैत्री करण्यासाठी भारताने केलेल्या विविध प्रयत्नांचा उल्लेखही राजनाथ सिंह यांनी केला. “भारताने नेहमीच पाकिस्तानच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला आहे. अटलबिहारी वाजपेयी असतील किंवा नरेंद्र मोदी असतील त्यांनी पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाला प्रोत्साहन दिले”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!

“…त्यापेक्षा जास्त पैसे आम्ही जम्मू काश्मीरला दिले”

दरम्यान, “केंद्रातील मोदी सरकारने २०१४-२०१५ मध्ये जम्मू-काश्मीरमधील विकासकामांना गती देण्यासाठी विशेष पॅकेज घोषणा केली होती. सरकारने हा निधी जवळपास ९० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. मुळात पाकिस्तानने आयएमएफला जितके पैसे मागितले, त्यापेक्षा जास्त पैसे आम्ही जम्मू काश्मीरला दिले”, असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath singh statement on pakistan economy india imf fund jammu kashmir spb