केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केल्यानंतर जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राष्ट्रीय जनता दलाचे बिहार प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनीही प्रतिक्रिया देत भाजपावर टीका केली आहे. “भाजपाने लोकांच्या मनातील राम हिसकावून केवळ दगडाच्या भव्य मंदिरात बसवला आहे,” असा आरोप जगदानंद सिंह यांनी केला. तसेच आम्ही रामवाले आहोत, जय श्रीरामवाले नाही, असं म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगदानंद सिंह म्हणाले, “द्वेषाचा उपयोग करून राम मंदिराची निर्मिती होत आहे. या देशात माणुसकीतच राम वसलेले आहेत. आता अयोध्येतील राम शबरीची उष्टी बोरं खाणारे नाहीत, तर दगडात कैद झालेले राम आहेत.”

“आम्ही रामवाले, जय श्रीरामवाले नाही”

“भारतात रामाला लोकांच्या मनातून हिसकावून केवळ दगडाच्या भव्य मंदिरात बसवलं जात आहे. आम्ही लोक हे रामवाले आहोत, जय श्रीरामवाले नाही,” असंही जगदानंद सिंह यांनी म्हटलं.

अमित शाह काय म्हणाले होते?

दरम्यान, अमित शाह यांनी ५ जानेवारीला एका भाषणात अयोध्या येथे निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराची तारीख जाहीर केली. “१ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिर तयार होईल. त्रिपुरामधील लोकांनी आताच तिकीट बुक करुन ठेवावे,” असे आवाहन त्यांनी केले. अमित शाह म्हणाले, “२०१९ साली मी भाजपाचा अध्यक्ष होतो. तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे की, ‘मंदिर वहीं बनाएंगे, तिथी नहीं बताएंगे’. आता राहुल गांधींनी कान उघडून ऐकावं, तुम्हाला १ जानेवारी २०२४ रोजी अयोध्यामध्ये गगनचुंबी राम मंदिर पाहायला मिळेल.”

अमित शाह पुढे म्हणाले, “फक्त राम मंदिरच नाही, तर एक-दोन वर्ष जाऊद्या माँ त्रिपुरी सुंदरी देवीचेही भव्य असे मंदिर बनवू. ते पाहण्यासाठी जगभरातून लोक इथे येतील. आम्ही काशी विश्वनाथ कॉरिडोर बनवला. महाकाल कॉरिडोर बनवला. सोमनाथ आणि अंबा मातेचे मंदिर सोन्याचे होत आहे. माँ विंध्यवासिनीचे नवीन मंदिर बनत आहे.”

हेही वाचा : विश्लेषण : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोम्मईंनी नेमकं काय ट्वीट केलं? वाचा दावे-प्रतिदावे आणि संपूर्ण वाद…

“अनेक वर्ष प्रलंबित असलेला राम मंदिराच्या उभारणीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन केले आणि मंदिराची पायाभरणी केली. आता १ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण होईल,” अशी घोषणा अमित शाह यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rjd jagadanand singh criticize bjp over politicization of ram temple pbs