पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी मानहानी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक अर्हतेविषयी केलेल्या विधानावरून आता सिंह यांच्याविरोधात गुजरातमधील कनिष्ठ न्यायालयात खटला चालेल.

मोदी यांच्या पदवीबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांनी केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्याला त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने १६ फेब्रुवारीला केजरीवाल आणि सिंह यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, आम्ही ही याचिका दाखल करून घेण्यास राजी नाही असे न्या. भूषण रामकृष्ण गवई आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने सोमवारी स्पष्ट केले. या खटल्यातील कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशावर कोणताही प्रभाव पडणार नाही असा विश्वास उच्च न्यायालयाने व्यक्त केल्याचे खंडपीठाने सांगितले.

हेही वाचा >>>“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

केजरीवाल आणि सिंह यांनी मोदी यांच्या शैक्षणिक पदव्यांविषयी उपहासात्मक आणि अवमानास्पद विधाने केल्याचा आरोप करत गुजरात विद्यापीठाचे निबंधक पियूष पटेल यांनी दोघांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यापूर्वी माहितीच्या अधिकार कायद्याअंतर्गत मुख्य माहिती आयुक्तांनी मोदींच्या पदव्यांविषयी माहिती देण्याचा आदेश दिला होता. तो गुजरात उच्च न्यायालयाने रद्द ठरवला होता. त्यानंतर केजरीवाल आणि सिंह यांनी कथित टिप्पण्या केल्या असा त्यांच्यावर आरोप आहे.

केजरीवाल यांच्या याचिकेवर आज निकाल

मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने २१ मार्चला केलेल्या अटकेविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी निकाल दिला जाणार आहे. या घोटाळय़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात केजरीवाल यांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. न्या. स्वर्ण कांत शर्मा दुपारी अडीच वाजता या याचिकेवर निकाल जाहीर करतील.

के कविता यांना दिलासा नाहीच

याच प्रकरणात अटकेत असलेल्या बीआरएसच्या आमदार आणि तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कविता यांना दिल्ली न्यायालयाने सोमवारी अंतरिम जामीन नाकारला. कविता यांना केवळ पुरावा नष्ट केला नाही तर साक्षीदारावर प्रभाव टाकण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली असे सकृतदर्शनी दिसत असल्याचे न्यायालयाने  स्पष्ट केले. आपल्या १६ वर्षीय मुलाची परीक्षा असल्यामुळे कविता यांनी अंतरिम जामीन मागितला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay singh accused of making offensive remarks about prime minister modi educational qualifications amy