राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना सोडून देण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. “एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचं आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देतं. हाच महिलांचा सन्मान आहे का?” असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आहे. ते मंगळवारी (२३ ऑगस्ट) दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार म्हणाले, “सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं १५ ऑगस्टचं भाषण ऐकलं. त्यात ते महिलांविषयी खूप चांगलं बोलले, महिलांच्या सन्मानाविषयी बोलले. एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचं आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देतं. बिल्किस बानोंवर कसे आणि किती अत्याचार झाले हे सर्वांना माहिती आहे.”

“बलात्काऱ्यांना सोडून देणं हा महिलांचा सन्मान आहे का?”

“हे प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने या प्रकरणातील दोषींना शिक्षा दिली. महिलांवर इतके अत्याचार केल्यानंतर गुजरातमधील सरकार या गुन्हेगारांना चांगली माणसं म्हणतं सोडून देतं. हा महिलांचा सन्मान आहे का? पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशाला महिलांविषयी जी दिशा दाखवली तो हाच रस्ता आहे का? यातून सरकार देशाला काय संदेश देत आहे?” असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : “भाजपा त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो, कारण…”, शरद पवारांचा गंभीर आरोप

“हे काम अत्यंत चुकीचं, मात्र हेच त्यांचं धोरण आहे”

“गुजरात सरकारने केलेलं हे काम अत्यंत चुकीचं आहे. मात्र, हेच त्यांचं धोरण आहे, हीच त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आज देशात अल्पसंख्याक समाजाबाबत शंका उपस्थित होत आहेत,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar criticize pm narendra modi over bilkis bano gang rape case pbs