चीनने अरुणाचल प्रदेश सीमेवरील जवळपास ३० ठिकाणांची नावे बदलल्याचे वृत्त आहे. यावरून भारत आणि चीनमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. चीनने अरुणाचल प्रदेशला आपला भाग म्हटले, तर अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी चीनला ठणकावून सांगितले. तसेच अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावे बदलल्याने कोणताही परिणाम होणार नसल्याचेही मंत्री एस.जयशंकर म्हणाले.

भारतात सध्या लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे नेते, प्रचार, सभा, पक्षाच्या बैठकी, मेळावे, यामध्ये गुंतलेले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील विविध ठिकाणी सभा घेणार आहेत. आता यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अधिकृत ट्विटर (एक्स) अकाऊंटवरून एक पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ट्विटमध्ये म्हटले की, “सत्ता राखण्यात मोदीजी इतके तल्लीन झालेत की, त्यांना चीनकडून भारतीय हद्दीत होणाऱ्या कुरापती दिसेनाशा झाल्या आहेत.”

हेही वाचा : “तुमच्या घराचं नाव बदललं तर…?”, अरुणाचल प्रदेशवरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीनला पुन्हा सुनावलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील निवडणुकीवेळी ५६ इंचाची छाती असल्याचा नारा देत ही टॅगलाइन वापरली होती. यानंतर ही टॅगलाइन खूप हिट ठरली होती. त्यानंतर यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून टीकाही झाली होती. तसेच केंद्रात मोदी सरकार सत्तेत अल्यानंतर देशातील काही शहराचे आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये अलाहाबादचे प्रयागराज (उत्तर प्रदेश) आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यांची नावे बदलण्याच्या प्रस्तावाला केंद्राने मंजूरी दिली होती. यानंतर ही नावे अनुक्रमे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’ देण्यात आली.

आता याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत एक खोचक ट्विट केले. ट्विटमध्ये म्हटले, “इथे मोदीजींनी ५६ इंचाची छाती म्हणून भारतातील शहराची नावे बदलली. मात्र, तिकडे चीनने अरुणाचलप्रदेश सीमेवरील आतापर्यंत ५६ भागांची नावे बदलली आहेत”, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने म्हटले आहे.

दरम्यान, चीनकडून अरुणाचलप्रदेश सीमेवरील नावे कोणत्या वर्षात, किती ठिकाणी नावे बदले, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सांगितले की, २०२१-१५, २०२३-११, २०२४-३०, अशा मिळून गेल्या चार वर्षात ५६ ठिकाणांची नावे चीनने बदलल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ट्विटमध्ये केला आहे.