महागाईविरोधात काँग्रेसने दिल्लीत केलेल्या आंदोलनावरुन शिवसेनेनं सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधींचं कौतुक केलं आहे. महागाईविरोधातील आंदोलनामध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरली मात्र इतर विरोधी पक्ष कुठे आहेत असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे. त्याचप्रमाणे या आंदोलनाला चिरडण्यासाठी त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही शिवसेनेनं टीका केली आहे. महागाईसारख्या प्रश्नांवर विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे असं म्हणतानाच विरोधकांमधील मतभेद हीच भाजपाची ताकद असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिरेकी वागण्यावर काँग्रेस हा एकमेव पक्ष लढा देत आहे
“महागाईृ, बेरोजगारी, जीएसटीच्या विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन करणारा एकमेव पक्ष म्हणून काँग्रेसकडेच बोट दाखवावे लागेल. महागाईबरोबरच काँग्रसने ‘ईडी’च्या विरोधातही जोरदार एल्गार केला. सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह असंख्य आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. संसदेत व संसदेबाहेर त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की केली. प्रियंका गांधी यांना तर पोलीस फरफटत, ओढत घेऊन जात आहेत, हे चित्र देशाने पाहिले. महागाई, बेरोजगारी, जीएसटीच्या प्रश्नांवर आणि ‘ईडी’ वगैरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकी वागण्यावर काँग्रेस हा एकमेव पक्ष लढा देत आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

धर्म ही अफूची गोळी…
“काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे हे चित्र निर्माण झाले आहे व त्याची दखल देशातील अन्य विरोधी पक्षांनी घेऊ नये याचे आश्चर्य वाटते. महागाई, बेरोजगारी हे विषय गंभीर आहेत, पण त्यावर बोलणाऱ्यांना देशद्रोही अथवा धर्मद्रोही ठरवले जाते. धर्म ही अफूची गोळी आहे व देशातील बहुसंख्य जनतेला रोजच या अफूची मात्रा दिली जात असल्याने जनता एक प्रकारच्या गुंगीतच आहे. महागाईविरुद्ध आंदोलनाची खिल्ली उडवताना भाजपातर्फे हीच अफूची गोळी पुन्हा चारली आहे. महागाई विरोधात काळे कपडे घालून काँग्रेसने आंदोलन केले. याचा संबंध भाजपाने अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाशी जोडला,” असा टोला सामनातून लगावण्यात आलाय.

प्रत्येक समस्या, प्रश्नांचा संबंध धर्माशी जोडणे कितपत योग्य आहे?
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी ५ ऑगस्ट २०१९ रोजीच अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करून कोटय़वधी हिंदूंचे शेकडो वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण केले होते. त्यामुळे त्या घटनेस आमचा विरोध आहे, हे दाखविण्यासाठी काँग्रेस नेतृत्वासह अन्य नेत्यांनी काळे कपडे घालून आजच्या दिवशी आंदोलन केले,’’ असे अमित शहा यांनी सांगितले. प्रत्येक समस्या, प्रश्नांचा संबंध धर्माशी जोडणे कितपत योग्य आहे?” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.

पंतप्रधानांच्या भावाने आंदोलन केल्याचा दिला संदर्भ
“महागाई-बेरोजगारीचा भस्मासूर उसळला आहेच. आंतरराष्ट्रीय बाजारातील कारणे काहीही असतील. पेट्रोल-डिझेलचे भाव शंभरीवर गेले व त्याचा फटका सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यास बसत आहे. महागाई व बेरोजगारीवर राम मंदिर हा उतारा नाही. राम मंदिर ही श्रद्धा व राष्ट्रीय अस्मिता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने अयोध्येत राम मंदिर होतच आहे. मात्र लोकांनी तुम्हाला सत्ता जी दिली आहे, ती सर्वसामान्यांचे जगणे सुसह्य करायला. पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हादभाई मोदी हे राष्ट्रीय रेशनिंग दुकानदार संघटनेचे प्रश्न घेऊन दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करायला उतरले. त्यांना विचारले, ‘‘काय हो, प्रल्हादभाई, पंतप्रधान तुमचे भाऊ असताना रस्त्यावर का उतरताय?’’ यावर प्रल्हादभाई ताडकन म्हणाले, ‘‘भाऊ पंतप्रधान आहे म्हणून उपाशी मरू का?’’ प्रल्हादभाईंच्या या उत्तरातच सगळे सारं आले,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.

इतर विरोधी पक्ष कोठे आहेत? त्यांची नेमकी भूमिका काय आहे?
“राम मंदिर उभे राहणारच आहे, पण म्हणून महागाई, बेरोजगारी, जीएसटीवर आवाज उठवायचा नाही का? रोज हजारो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. रिझर्व्ह बँकेने जे पतधोरण जाहीर केले, त्यात रेपो दरात अर्धा टक्क्याने वाढ केली. या वाढीचा फटका कर्जदारांना बसणार आहे. रेपो दरात वाढ केल्याने गृहकर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, वाहन अशा सर्व प्रकारच्या कर्जांच्या ईएमआयचा बोजा वाढणार आहे. महागाई भडकली असली तरी निमूट त्या आगीत होरपळून मरा. महागाईविरुद्ध बोंब माराल तर याद राखा, असेच केंद्र सरकारचे धोरण आहे. ही हुकूमशाही आहे. लोकशाहीची गळचेपी आहे. त्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली, पण इतर विरोधी पक्ष कोठे आहेत? त्यांची नेमकी भूमिका काय आहे? हे एक रहस्यच आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

विरोधकांनी एकत्र येऊ नये यासाठी ‘ईडी’ची दहशत
“दिल्लीत काँग्रेस रस्त्यावर उतरली असताना प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बहुधा दिल्लीतच होत्या व त्यांच्या राज्याचा जीएसटी परतावा मिळावा म्हणून विनवणी करीत होत्या. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत थातूरमातूर कारणावरून त्यांनी मतदान केले नाही ही बाब आम्हाला गंभीर वाटते. प. बंगालात ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या राजकीय कारवाया वाढल्या. त्याचा हा परिणाम नसावा, पण राहुल व सोनिया गांधी यांनाही ‘ईडी’ने घेरले आहे तरी महागाई-बेरोजगारीविरुद्ध ते रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत. अशा वेळी सर्व मतभेद विसरून विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विरोधकांच्या बेकीतच भाजपाचे बळ आहे. विरोधकांनी एकत्र येऊ नये यासाठी ‘ईडी’ची दहशत निर्माण केली जाते,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

याची नोंद काळ्या इतिहासात होईल
“राहुल गांधी यांनी बेडरपणे सांगितले आहे, ‘‘मी तुमच्या ‘ईडी’ला घाबरत नाही. हवी ती कारवाई करा!’’ महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यावर त्याच पद्धतीने सूडाची कारवाई होताच शिवसेनेनेही तीच आक्रमक भूमिका घेतली, पण विरोधी पक्षातील इतर पुढाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. हे लोकशाही व स्वातंत्र्यासाठी चिंताजनक आहे. ‘ईडी’चा वापर करून राज्यातील सरकारे पाडली जातात व बनवली जातात. त्याच मार्गाचा अवलंब करून महागाई, बेरोजगारी या ज्वलंत प्रश्नांवरही वाचा बंद केली जाते. याची नोंद काळ्या इतिहासात होईल, हे आज शेपूट घालणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

कोणी खरंच भयमुक्त असेल तर हा धडा घ्यावा
“मुळात लोकशाहीत निषेध करण्यासाठी काळे कपडे, काळे झेंडे, काळा इतिहास ही प्रतिके आहेत. दक्षिणेतील देवांना तर काळ्या कपड्यांचाच सोस आहे. भाजपानेही अनेक आंदोलनांत काळे कपडे, काळे झेंडे यांचा मुक्त वापर केला आहे. महागाई, बेरोजगारी व ‘ईडी’चा दहशतवाद हा भारताच्या लोकशाहीतील काळा अध्याय आहे. काँगेसची ताकद क्षीण आहे, पण दिल्लीत सरकारी दहशतीची पर्वा न करता गांधी कुटुंब रस्त्यावर उतरले हे लक्षात घ्यायला हवे. इतर विरोधकांसाठी हा धडा आहे. कोणी खरंच भयमुक्त असेल तर हा धडा घ्यावा,” असं लेखाच्या शेवटी म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena praises congress agitation against ed inflation and politics in the country scsg
First published on: 08-08-2022 at 07:38 IST