नवी दिल्ली : भाजपने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जमवलेल्या प्रचंड निधीतून राजकीय क्षेत्रातील लोकांवर दबाव आणला. केंद्राच्या अखत्यारीतील यंत्रणा आणि पैशांच्या बळावर भाजपने देशातील लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भाजपने गेल्या १० वर्षांत ४११ आमदारांना फोडले, सरकारे पाडली. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना धमकावले. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला, असे अनेक आरोप काँग्रेसने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या काळय़ापत्रिकेत (ब्लॅक पेपर) करण्यात आले आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रातील मोदी सरकारची गेली दहा वर्षे म्हणजे अन्यायाचा काळ असल्याचा ठपका काँग्रेसने ठेवला आहे. ‘दहा वर्षांचा अन्यायाचा काळ (२०१४-२४)’ या मोदी सरकारविरोधातील काळय़ापत्रिकेत केंद्राच्या कथित चुकीच्या आर्थिक धोरणाची चिरफाड करण्यात आली आहे. काळय़ापत्रिकेत चीनविषयक धोरण, ‘ईडी’चा गैरवापर, अग्निपथ योजनेतील फोलपणा, प्रसारमाध्यमांवरील अंकुश, रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्वायत्ततेवर घाला अशा अनेक आर्थिक मुद्दय़ांच्या अनुषंगाने मोदी सरकारवर टीकास्त्रे डागण्यात आली आहेत.

हेही वाचा >>>इंडिया आघाडीला महाराष्ट्रात ४८ पैकी २६ जागा मिळणार; वाचा सर्व्हे काय सांगतात?

मी आणखी पाच वर्षे सत्तेत राहीन असे सांगण्यापेक्षा मोदींनी गेल्या १० वर्षांत त्यांच्या सरकारने काय केले हे सांगायला हवे होते. पण, ते केवळ काँग्रेसवर टीका करत राहतात. खरे तर मोदींनी महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमता या मुद्दय़ांवर बोलायला हवे होते. परंतु ते फक्त ‘मोदीची गॅरंटी’ असे म्हणतात. वास्तविक या गॅरंटीतून लोकांची दिशाभूल केली जात आहे. नेहरू आणि इंदिरा गांधींवर टीका करण्यापेक्षा आत्ता तुम्ही केंद्रात राज्य करत आहात, तुम्ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी काय केले? किती जणांना नोकऱ्या दिल्या. तुम्ही मनरेगाचा निधीदेखील देत नाही. राज्या-राज्यांमध्ये भेदभाव करता, अशी टीका खरगे यांनी पत्रकार परिषदेत केली.

गेल्या दहा वर्षांमध्ये (२०१४-२४) मोदी सरकारने वेगाने विकास केला. त्यामुळे २५ कोटी लोक गरिबीतून मुक्त झाले. पण, यूपीए सरकारच्या काळात प्रचंड आर्थिक गैरव्यवस्थापन झाले असून त्यातून धडा शिकवण्याची गरज आहे. त्यासाठी २००४-१४ या काँग्रेस सरकारच्या काळातील आर्थिक गैरव्यवस्थापन उघड करणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत लेखानुदान सादर करताना स्पष्ट केले होते. ही श्वेतपत्रिका गुरुवारी संध्याकाळी लोकसभेत मांडली जाणार असल्याची कुणकुण लागताच, काँग्रेसने गुरुवारी सकाळी मोदी सरकारच्या दहा वर्षांतील आर्थिक धोरणाची कथित काळी बाजू मांडणारी ५४ पानांची काळी पत्रिका प्रसिद्ध केली.

हेही वाचा >>>“त्या दिवशी मनमोहन सिंग रडले, मला खूप गोष्टी माहिती आहेत, पण…”, माजी पंतप्रधानांचा राज्यसभेत धक्कादायक दावा!

काँग्रेस देशाचे उत्तर-दक्षिण विभाजन करत असल्याच्या आरोपाला उत्तर देताना, खरगे म्हणाले की, गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी काँग्रेस सरकारला राज्यांना कर महसुलातील ५० टक्के वाटा देण्याचे आवाहन केले होते. गुजरात ४८,६०० कोटी रुपये देतो पण, त्या बदल्यात फक्त २.५ टक्के निधी मिळतो, अशी मोदींची तक्रार होती. राज्यांच्या निधी वाटपामध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप मोदींनी त्यावेळी केला होता. आता मात्र कोणी हाच आरोप केला तर त्याला देशद्रोही ठरवले जाते. काँग्रेस देश तोडण्याची भाषा करत असल्याचा आरोप केला जातो. पण, भाजप लोकांना भडकवण्याचा आणि दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो, असा आरोपही खरगेंनी केला.

बेरोजगारीचे प्रमाण ४५ वर्षांतील सर्वाधिक असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले असले तरी, हमीभावात अपेक्षित वाढ झालेली नाही. नोटाबंदी आणि सदोष जीएसटी या चुकीच्या धोरणांतून आर्थिक आपत्ती कोसळली आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील तफावत वाढली. लाखो शेतकरी, रोजंदारी कामगार उद्ध्वस्त झाले. मोदींच्या कार्यकाळात फक्त कुडमुडय़ा भांडवलदारांचे भले झाले आहे. घटनात्मक संस्थांना, तपास यंत्रणांना निष्क्रिय केले आहे. महिला, दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत, अशी टीकाही खरगेंनी केली.

मला वाटले होते, आज विरोधी खासदार काळय़ा कपडय़ांत येतील पण, ते आता काळय़ा कागदावर गेले आहेत. मी त्याचेही स्वागत करतो. जेव्हा काही चांगले घडते तेव्हा काळा टिळा आवश्यक असतो. खरगेंसारख्या बुजुर्ग व्यक्तीने तो लावणे आमच्यासाठी अधिक स्वागतार्ह आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The black paper released by the congress on thursday criticized the bjp amy