नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची बुधवारी सांगता झाली असून १०२ जागांसाठी शुक्रवारी मतदान होईल. पहिल्या टप्प्यामध्ये भाजपच नव्हे तर, ‘एनडीए’तील घटक पक्षांसाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच प्रमुख ‘प्रचारक’ ठरले. या निवडणुकीचे आणखी सहा टप्पे बाकी असून फक्त मोदींचा चेहरा प्रचारात असल्याने त्यांच्या भाषणाचा अतिमारा मतदारांवर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पंतप्रधान मोदी दररोज दोन-तीन प्रचारसभा घेत आहेत. चंद्रपूर व रामटेक या दोन ठिकाणी मोदींनी प्रचारसभा घेतल्या. त्यापैकी रामटेकच्या सभेत मोदींचे भाषण सुरू असताना लोक उठून जात असल्याचे दिसत होते. पहिल्या टप्प्यातील मोदींची भाषणेही केवळ १५ मिनिटांची होती. त्यापूर्वी कधीही मोदींनी इतक्या कमी वेळेत प्रचाराची भाषणे संपवलेली नव्हती. तीन दिवसांपूर्वी भाजपच्या मुख्यायलाच्या इमारतीमध्ये संकल्पपत्राच्या प्रकाशनानंतर झालेले मोदींचे भाषण देखील तासभर झाले होते. ‘एनडीए’तील घटक पक्षांसाठी मोदी प्रचारक असल्याने त्यांच्या भाषणांचा अतिमारा होत असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा >>>अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!

२०१४ व २०१९ मध्ये मोदी भाजपसाठी प्रचार करत होते, आता त्यांच्यावर मित्र पक्षांच्या उमेदवारांनाही निवडून आणण्याची जबाबदारी आहे. यासंदर्भात भाजपच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

मोदींच्या भाषणांमध्ये अनुच्छेद ३७० रद्द करणे, राम मंदिराचे उद्घाटन, सीएए या भाजपच्या आश्वासनपूर्तीचा तसेच, भ्रष्टाचाराविरोधी मोहिमेचाही उल्लेख होतो. मात्र, नव्या लक्षवेधी मुद्दय़ाची पेरणी मोदींकडून झाली नसल्याचे दिसते. ‘मोदींकडे नवे बोलण्याजोगे काही नसेल तर  ते काय सांगणार? बेरोजगारी, महागाई वाढली. विदेशी कर्जात वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात घसरण झाली. या मुद्दय़ांवर मोदी बोलताना दिसतात का? लोकांसाठी महत्त्वाचे प्रश्न भाषणातून गाळून टाकतात’, अशी टीका ‘भाकप’चे महासचिव डी. राजा यांनी केली.

आरोप-प्रत्यारोप

’ ‘भाजपने २०१९ च्या जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण केल्यामुळे त्याचा उल्लेख मोदींच्या भाषणांमधून होतो. पण, मोदींचा भर पुढील २५ वर्षांनंतरच्या विकसित भारत या एकाच विषयावर आहे.

’ २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न मोदींनी दाखवले आहे. हाच यावेळी मोदींच्या भाषणातील नवा मुद्दा आहे’, असे राज्यात ‘एनडीए’मध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितले.

’ काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी मोदींवर टीका केली. ‘प्रत्येक कथानक (नॅरेटिव्ह), प्रत्येक बनावट कहाणी, स्वत:साठी सक्षम वाटणाऱ्या प्रत्येक मुद्दय़ाचा कधीतरी शेवट होत असतो. हे मुद्दे अनंत काळासाठी वापरता येत नाहीत.