Two Nepalese Arrested For Attacking Ladakh Police: लेहमधील हिंसाचारादरम्यान पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली दोन नेपाळी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत दोघांनाही गोळी लागली आहे. यामुळे आंदोलनात देशाबाहेरील लोकांच्या उपस्थितीबद्दल चिंता व्यक्त होत आहे. या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत, जवळजवळ ६० जणांना अटक करण्यात आली आहे.

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस सूत्रांनी सांगितले की, हिंसाचारात चार नेपाळी नागरिक जखमी झाले आहेत, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर दोघांवर उपचार सुरू आहेत. यातून हिंसाचारात परदेशी लोकांचा सहभाग असल्याचे दिसून येते. अटक केलेल्यांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी एसएनएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपास सुरू असताना आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे.

सोनम वांगचुक यांची चौकशी

तत्पूर्वी, हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचीही लडाख आंदोलनाची तुलना नेपाळच्या ‘जेन-झेड क्रांती’शी करण्याच्या त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल चौकशी करण्यात आली आहे. बुधवारी त्यांचे उपोषण मागे घेताना, वांगचुक यांनी लेहमधील निदर्शने ही ‘जेन-झेड क्रांती’ होती व बेरोजगारी आणि त्यांचे लोकशाही हक्क हिरावले जात असल्याने तरुण संतप्त असल्याचे म्हटले होते.

बुधवारी लेहमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता. तसेच किमान ५० जण जखमी झाले होते. आंदोलकांनी लेहमधील भाजपा कार्यालयालाही आग लावली होती. हिंसाचारानंतर, लडाखला राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी गेल्या ३५ दिवसांपासून उपोषण करणारे हवामान कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले होते. यानंतर लेह प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश लागू केले होते.

नोपाळचे जेन झेड आंदोलन

या महिन्याच्या सुरुवातीला, नेपाळमधील तरुणांनी २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्याच्या निर्णयाविरुद्ध हिंसक आंदोलन केले होते. आंदोलकांनी याला जेन झेड आंदोलन म्हटले होते. तरुण आंदोलकांनी देशाच्या संसदेला, पंतप्रधानांच्या निवासस्थानाला आणि राष्ट्रपतींच्या निवासस्थानालाही आग लावली होती.

आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात सुमारे दहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे आणि ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आणि त्यांचे मंत्रिमंडळ बरखास्त केले.

आंदोलक, लष्कर आणि इतर प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकीत सुशीला कार्की यांची अंतरिम पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. सुशीला कार्की त्यांचे अंतरिम मंत्रिमंडळ सहा महिन्यांनी देशात निवडणुका घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.