UP CM Yogi Adityanath on Political Islam: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधील आरएसएसच्या एका कार्यक्रमात बोलताना केलेलं विधान चर्चेत आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देताना योगी आदित्यनाथ यांनी राजकीय इस्लामचा उल्लेख केला आहे. त्यांच्या या विधानावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर गुरू गोविंद सिंग, महाराणा प्रताप आणि महाराणा संगा यांचीही नावं घेतली आहेत. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

योगी आदित्यनाथ यांनी सनातन धर्माचं सर्वात मोठं नुकसान राजकीय इस्लाममुळे झाल्याचा दावा केला आहे. “भारताच्या इतिहासात ब्रिटिश व फ्रेंच वसाहतवादाचा नेहमीच उल्लेख केला जातो. पण भारतातील राजकीय इस्लामबाबत मात्र अगदीच तुरळक उल्लेख आढळतो. याच राजकीय इस्लाममुळे सनातन धर्माला सर्वात मोठा धक्का दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंद सिंग, महाराणा प्रताप, महाराणा संगा यांच्यासारख्या महान योद्ध्यांनीही राजकीय इस्लामविरोधात लढा दिला आहे”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

इतिहासाच्या या बाजूकडे दुर्लक्षच – योगी आदित्यनाथ

दरम्यान, इतिहासातील राजकीय इस्लामबाबतच्या बाजूकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आल्याचं योगी आदित्यनाथ यांचं विधान चर्चेत आलं आहे. “आपल्या पूर्वजांनी राजकीय इस्लामविरोधात मोठा लढा दिला. पण तरीदेखील इतिहासाची ही बाजू कायमच दुर्लक्षित राहिली आहे”, असं ते म्हणाले. आरएसएसच्या गोरखपूर विभागातर्फे आयोजित ‘विचार-परिवार कुटुंब स्नेह मिलन’ व ‘दीपोत्सनव से राष्ट्रोत्सव’ कार्यक्रमात ते बोलत होते.

वेगवेगळ्या नावाने राजकीय इस्लामचा प्रचार करण्याचे प्रयत्न सातत्याने चालू असल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केला. तसेच, उत्तर प्रदेशमध्ये हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अशा विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याचा वापर धर्मांतर, लव्ह जिहाद आणि दहशतवादासारख्या कारवायांसाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

राम मंदिरासाठी केलं RSS चं कौतुक

यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील राम मंदिर उभारणीमधील RSS चं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं नमूद केलं. “समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि इंडिया आघाडी राम मंदिराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना आरएसएसच्या स्वयंसेवकांनी मंदिर उभारणीच्या कामात स्वत:ला झोकून दिलं होतं. संघाला यासाठी अनेक बंधनांचा सामना करावा लागला. आरएसएसच्या स्वयंसेवकांना लाठीचार्ज आणि बंदुकीच्या गोळ्याही झेलाव्या लागल्या. त्या सर्वांच्या बांधिलकीचं प्रतीक म्हणून आज एक विशाल राम मंदिर उभं राहिलं आहे”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.