Yogi Adityanath Amit Shah : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. या अपयशाचं खापर योगी आदित्यनाथ यांच्यावर फोडलं जात आहे. त्यासाठी योगींचे विरोधक उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांना हाताशी धरत आहेत. भाजपात एका बाजूला योगींविरोधात वातावरण तापलेलं असताना मौर्य यांनी वारंवार दिल्लीच्या फेऱ्या केल्या आहेत. ते सातत्याने भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करत आहेत. मौर्य यांच्या खांद्यावरून योगींवर नेम धरला जात असेल तर बंदूक अमित शाह यांच्या हाती असेल अशी कुजबूज चालू आहे. योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं जाणार असल्याची चर्चा देखील चालू आहे.

योगी आणि अमित शाह यांच्यात संघर्ष चालू असल्याचे दावे केले जात असतानाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमाच्या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेशमधील अनेक नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं स्वागत करण्यासाठी उभे आहेत. हे सर्व नेते शाह व सिंह या दोघांना हात जोडून नमस्कार करताना दिसत आहेत. मात्र योगी आदित्यनाथ यांनी शाह यांना नमस्कार केला नाही. त्यांनी केवळ राजनाथ सिंह यांनाच हात जोडून नमस्कार केला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (छायाचित्र : पीटीआय)

हे ही वाचा >> Maldives President : आधी वाद आता धन्यवाद! मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले भारताचे आभार, मुक्त व्यापाराच्या करारासाठीही आशावादी!

“काय बिनसलंय कुणास ठाऊक”, जितेंद्र आव्हाडांचा टोला

इंडिया आघाडीतील नेते हा व्हिडीओ शेअर करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. यासह त्यांनी म्हटलं आहे की “काय बिनसलंय कुणास ठाऊक, योगीजींनी फक्त राजनाथ सिंह यांना हात जोडून नमस्कार केला!” योगी आदित्याथ व अमित शाह यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं सूचक वक्तव्य आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमधून केलं आहे.

हे ही वाचा >> Prashant Kishor : राजकीय पक्षांसाठी काम करणारे प्रशांत किशोर पुढाऱ्यांना धक्का देणार, गांधी जयंतीच्या मुहूर्तावर बिहारमध्ये ‘खेला’ करणार

मोदींनंतर भाजपात योगींसह चार प्रमुख नेते

सध्या भाजपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर स्वत:ची वेगळी ओळख असलेले केवळ चार नेते आहेत. अमित शाह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ व देवेंद्र फडणवीस. हे नेते मोदींनंतर भाजपाचं आणि भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास देशाचं नेतृत्व करू शकतात. मात्र या चार नेत्यांमध्ये देखील अंतर्गत स्पर्धा असल्याचं चित्र अनेकदा पाहायला मिळालं आहे.