काही दिवसांपासून सतत एक शब्द आपल्या कानावर पडतो आहे आणि तो म्हणजे सिंदूर. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन ‘सिंदूर’च्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ भारताने उद्ध्वस्त केले. भारताने ऑपरेशन ‘सिंदूर’च्या माध्यमातून केलेल्या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. दरम्यान, आता भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
“आज प्रत्येक दहशतवादी, दहशतवाद्यांची प्रत्येक संघटना जाणून आहे, की आपल्या माता-भगिनींच्या कपाळावरून कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो. ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाहीये. ते देशातल्या कोट्यवधी लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एका भाषणादरम्यान सांगितले.
ऑपरेशन सिंदूरमुळे गेल्या काही दिवसांपासून सिंदूर हा शब्द अनेकांच्या कानावर पडत आहे. सिंदूर म्हणजे सौभाग्याचे प्रतीक हे सर्वांना माहीत आहे. मराठीत सिंदूरला कुंकू, असे म्हटले जाते. पण, इंग्रजी भाषेत सिंदूरला काय म्हणतात तुम्हाला माहीत आहे का?
सिंदूरचे महत्त्व (SIGNIFICANCE OF SINDOOR)
सिंदूर म्हणजे लाल-केसरी रंगाची पावडर आहे. ती विवाहित महिला सौभाग्याचे लेणं म्हणून कपाळी कुंकू लावतात किंवा भांगेत सिंदूर भरतात.
सिंदूरला इंग्रजीत काय म्हणतात?
सिंदूरचे इंग्रजी नाव ‘vermilion’ (वर्मिलियन) आहे आणि सिंदूरचे रासायनिक नावही ‘‘vermilion’ असे आहे.
सिंदूरमधील घटक
सिंदूरच्या सामान्य घटकांपैकी एक म्हणजे सिन्नबार (Cinnabar). हा एक पारा धातू आहे, जो हलक्या लाल रंगाचा असतो. सिंदूर बनविण्यापूर्वी ते डिस्टिल्ड आणि रिफाइंड केले जाते.
सिंथेटिक आणि नैसर्गिक पद्धतीने निर्मिती (SYNTHETIC AND NATURAL FORMATION)
सिंदूर ही एक रासायनिक कॉस्मेटिक पावडर आहे, जी शिसे आणि ऑक्सिजनपासून बनलेली असते. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे, सिंदूरदेखील नैसर्गिक घटकांपासून बनवले जाते.
भारतातील सिंदूर वनस्पती (SINDOOR PLANT IN INDIA)
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सिंदूरची निर्मिती एका वनस्पतीपासून होते. सुरुवातीला त्याची फुले हिरवी असतात; परंतु नंतर ती लाल होतात. महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशात याचे पीक घेतले जाते.