डायनासोरच्याही आधी पृथ्वीवर झुरळे प्राण्यांच्या साम्राज्याचा एक भाग होती, असे म्हटले जाते. हे लहान कीटक केवळ स्वयंपाकघरातील स्वच्छतेसाठीच धोकादायक नाहीत, तर आपल्यासाठीही धोकादायक आहेत. अशातच झुरळांबद्दल काही धक्कादायक आणि भयानक गोष्टी ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.

१. झुरळे काहीही खातात — तुमच्यासह.

त्यांना मांस, मिठाई, स्टार्च व बीअर आवडते. एवढंच नाही, तर ते पुस्तकांची कव्हरं, वॉलपेपर, मृत त्वचा, साबण, कचरा व विष्ठा खातात आणि तुम्ही झोपताना ते तुमच्या पायांची नखे, पापण्या व भुवयांनादेखील चावू शकतात.

२. त्यांच्या आत नरभक्षक लपलेले असतात

वर वाचल्याप्रमाणे झुरळे काहीही खाऊ शकतात. परंतु, जर परिस्थिती कठीण झाली आणि अन्नाची कमतरता भासली, तर ते एकमेकांनाही खाऊ शकतात.

३. झुरळे त्यांच्या डोक्याशिवायही जगू शकतात

हो, ही भयानक वाटणारी बाब खरी आहे. झुरळे त्यांचे डोके गमावल्यावरही काही काळ जिवंत राहू शकतात. कारण- ती शरीरावरील छिद्रांमधून श्वास घेतात आणि त्यांची रक्ताभिसरण प्रणाली उघडी असून, डोक्याच्या अनुपस्थितीतही त्यांच्या शरीरात रक्तप्रवाह सुरू राहतो. त्यांचे आवश्यक अवयव डोक्याऐवजी छातीत असतात. त्यामुळे झुरळे त्यांचे डोके गमावल्यावरही काही काळ जिवंत राहू शकतात.

४. झुरळाच्या दुधाबद्दल ऐकलंय का?

तुमच्या जवळच्या किराणा दुकानात लवकरच झुरळाचे दूध ट्रेंडमध्ये येऊ शकते. एका संशोधनानुसार, झुरळाचे दूध गाईच्या दुधापेक्षा तिप्पट जास्त पौष्टिक असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. हे ऐकायला विचित्र वाटेल; पण शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, झुरळांचे दूध, विशेषतः डिप्लोप्टेरा पंक्टाटा प्रजातीचे, गाईच्या दुधापेक्षा तिप्पट जास्त पौष्टिक असू शकते.

६. झुरळांचा चहा

काही संस्कृतींमध्ये झुरळांचा वापर घरगुती उपचारांमध्ये केला जात असे. ग्रीक आणि इजिप्शियन लोक औषधी उद्देशाने कुस्करलेल्या किंवा उकडलेल्या झुरळांचा वापर करत असत. काही संस्कृतींमध्येही औषधी उपाय म्हणून उकडलेल्या झुरळांच्या चहाचा वापर केला जात असे. तुमच्या स्थानिक कॉफी शॉप मेनूमध्ये तुम्हाला हे पाहायला आवडणार नाही; परंतु पूर्वी अशा प्रकारे झुरळांच्या चहाचे लोक उपचारासाठी सेवन करायचे.

७. उपयोगी कीटक

काही झुरळांच्या प्रजाती पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण- त्या परिसंस्थेतील अन्न जाळे आणि पोषक घटकांच्या चक्रात महत्त्वाची भूमिका बजावतात.