दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबरला ‘जी-२०’ शिखर परिषद पार पडली. या बैठकीला ४० हून अधिक देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीत दाखल झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेही दिल्लीत आले होते. पण, आता जो बायडेन यांच्या कारची अधिक चर्चा होत आहे. जो बायडेन यांच्या कारचं नाव ‘द बीस्ट’ आहे. याच कारमधून जो बायडेन यांनी दिल्लीत प्रवास केला. चला तर मग ‘द बीस्ट’ कारबद्दल जाणून घेऊया…
बोइंग-१७ ग्लोबमास्टर-३ या अमेरिकेच्या लष्करी विमानातून ‘द बीस्ट’ ही कार भारतात आणली गेली. या कारवर सतत अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचं लक्ष असतं.
हेही वाचा : चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते?
‘कॅडिलॅक वन’ ही कार जनरल मोटर्सनं २०१८ साली तयार केली होती. या कारची किंमत १५.८ मिलियन ( भारतीय १३१ कोटी रूपये ) आहे. तिला ‘द बीस्ट’ या टोपणनावाने ओळखलं जातं. ‘द बीस्ट’चं वजन ६,८०० ते ९,१०० किलोग्रॅमच्या दरम्यान असते. यामध्ये सातजण बसू शकतात.
कारच्या बंपरमध्ये शॉटगन आणि अश्रूधुराच्या नळकांड्या असतात. बॉम्ब आणि ग्रेनेडच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी कारच्या खाली स्टीलच्या प्लेट्स लावल्या आहेत. कारचे दरवाजे २० सेंटीमीटर जाडीचे आहेत. तर, इंधनाची टाकी बुलेट आणि ब्लास्ट प्रूफ आहे. कारवर रासायनिक शस्त्रांनी हल्ला केला, तर केबिन आपोआप लॉक होते.
हेही वाचा : मोर पाऊस पडल्यानंतरच का नाचतो, माहिती आहे का?
‘द बीस्ट’च्या काचा १३ सेंटीमीटर जाड आहेत. टायर पंक्चर झाले, तरी त्याच वेगाने कार धावत राहणार. कारमध्ये अग्निशामक यंत्रणा, रासायनिक हल्ला झाल्यास ऑक्सिजन आणि राष्ट्रध्यक्षांच्या रक्त गटाच्या दोन बाटल्या ठेवलेल्या असतात.