महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आज धुळ्यात अमित शाह यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेससह उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे हे केवळ सत्तेसाठी तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसबरोबर गेले, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाच प्रश्नही विचारले. हिंमत असेल त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावी, असे आव्हानही त्यांनी दिलं.

नेमकं काय म्हणाले अमित शाह?

ही निवडणूक दोन गटात विभागली गेली आहे. एकीकडे नरेंद्र मोदी आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. एकीकडे १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे करणारे काँग्रेस सरकार आहे, तर दुसरीकडे ज्यांच्यावर २५ पैशांच्या घोटाळ्याचा आरोप नाही, असे मोदी सरकार आहे. एकीकडे चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले राहुल गांधी आहेत, तर दुसरीकडे चहा विकणाऱ्या गरीब घरात जन्माला आलेले नरेंद्र मोदी आहेत. जनतेला आता या दोघांमधील एकाला निवडायचं आहे, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली.

हेही वाचा- वसई : गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिपॅडची जागा बदलली, मुस्लिम संघटनांच्या तीव्र विरोधानंतर निर्णय

पुढे बोलताना त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. काँग्रेस नेते आणि शरद पवार यांनी अनेक वर्ष राम मंदिराचा मुद्दा न्यायालयात अडकवून ठेवला, त्यामुळे राम मंदिर बांधायला उशीर झाला. मात्र, मोदींनी पाच वर्षात राम मंदिर बांधून दाखवले. ज्यावेळी अध्योध्येत प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला, त्यावेळी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. कारण त्यांना मुस्लीम मते आपल्यापासून दूर जातील, अशी भिती होती. मात्र, मोदींना तशी चिंता नव्हती, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंना विचारले पाच प्रश्न :

यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाच प्रश्नही विचारले. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय चुकीचा आहे, असं विधान राहुल गांधी यांनी केलं आहे. त्याच राहुल गांधींबरोबर उद्धव ठाकरेंनी हात मिळवणी केली आहे. त्यामुळे कलम ३७० रद्द करणं योग्य की अयोग्य याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं? आज काँग्रेसचे नेते आतंकवादी कसाबचे समर्थन करत आहेत, त्याच काँग्रेसच्या नेत्यांबरोबर आज उद्धव ठाकरेंनी युती केली आहे. त्यामुळे ते काँग्रेसच्या नेत्यांच समर्थन करतात का? हे उद्धव ठाकरेंनी सांगावं? मोदी सरकारने देशात तीन तलाकची प्रथा बंद केली. मात्र, काँग्रेस पक्ष मुस्लीम पर्सनल लॉ पुन्हा लागू करण्याचा पर्यत्न करत आहेत. त्याला उद्धव ठाकरेंच समर्थन का हे त्यांनी सांगावं? काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने वीर सावरकर यांचा अपमान केला जातो आहे, त्यांना हे मान्य आहे का? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं. आणि काँग्रेस आणि मित्रपक्षांकडून सनातन धर्माचा विरोध केला जातो आहे, हे उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? याचं उत्तर त्यांनी द्यावं, असे ते म्हणाले. तसेच हिंमत असेल उद्धव ठाकरेंनी या प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे आव्हानही त्यांनी दिले.