अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीमधील सदस्य पक्ष असला तर बच्च कडू गेल्या काही महिन्यांपासून महायुतीवर नाराज आहेत. कडू यांनी त्यांची नाराजी सातत्याने बोलून दाखवली आहे. बच्चू कडू हे प्रामुख्याने भाजपावर नाराज आहेत. भाजपा महायुतीतल्या छोट्या पक्षांना योग्य पद्धतीने वागवत नसल्याचा आरोप कडू यांनी अनेक वेळा केला आहे. तसेच बच्चू कडू हे सातत्याने भाजपावर आणि भाजपाच्या नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत. तसेच अमरावतीत बच्चू कडू आणि खासदार नवनीत रणा यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. भारतीय जनता पार्टीने नवनीत राणा यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना अमरावतीतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. बच्चू कडू यांनी भाजपाच्या या निर्णयालादेखील विरोध केला. परंतु, महायुतीने बच्चू कडू यांच्या विरोधाला न जुमानता पूर्ण ताकदीनिशी नवनीत राणा यांच्या प्रचार सुरू केला. त्यानंतर बच्चू कडू यांनी अमरावतीत प्रहारकडून दिनेश बूब यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. बच्चू कडू हे दिनेश बूब यांचा प्रचार करत आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने अमरावतीत नवनीत राणांचा प्रचार करत आहेत. महायुतीने नुकतीच अमरावतीतल्या दर्यापूर येथे नवनीत राणांसाठी प्रचारसभा घेतली. देवेंद्र फडणवीस हे या प्रचारसभेला उपस्थित होते. त्यांनी यावेळी बोलताना महायुतीतल्या सर्व प्रमुख नेत्यांचा आणि पक्षांचा उल्लेख केला. मात्र फडणवीसांनी बच्चू कडू आणि त्यांच्या पक्षाचा उल्लेख करणं टाळलं. त्यामुळे बच्चू कडूंच्या पक्षाला महायुतीतून बाहेर काढल्याची चर्चा रंगू लागली आहे. यावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बच्चू कडू म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी आमचा उल्लेख केला नाही, आमच्या पक्षाचं नाव घेतलं नाही याबाबत मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी आमचं नाव घेतलं नाही ते बरं केलं. कारण त्यांनी आमचं नाव घेतलं असतं तर लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या असत्या. त्यामुळेच त्यांनी आमचंच काम केलं आहे.

हे ही वाचा >> Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल

बच्चू कडू म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच वर्ध्यात सभा झाली. त्या सभेत ते म्हणाले, उमेदवाराबाबत तुमच्या मनात नाराजी असेल तर तुम्ही माझ्याकडे पाहून मत द्या. म्हणजेच मोदींनी स्पष्ट सांगितलं की, आमचा उमेदवार कार्यक्षम नाही. आमचा उमेदवार काहीच करू शकत नाही. मोदींनी जनतेला इतका स्पष्ट संदेश दिला आहे. भाजपाचा उमेदवार कार्यक्षम नाही हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होतंय. ते कोणाच्या नावाने मतं मागतायत, त्यांच्यावर कोणाच्या नावाने मतं मागायची वेळ आलीय ते स्पष्ट झालंय. त्यांच्या (भाजपा) उमेदवाराने मोदींसारख्या मोठ्या नेत्यावर असं वक्तव्य करण्याची वेळ आणणं ही मोठी शोंकांतिका आहे. भाजपासाठी ही दुर्दैवी गोष्ट आहे.