लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. आज (दि. २६ एप्रिल) लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा दुसरा टप्पा पार पडत आहे. एकूण सात टप्प्यात निवडणूक होत आहे. मतदानाचा टक्का वाढवा, यासाठी सर्वच यंत्रणा प्रयत्न करत असतात. राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटी, खेळाडू, महत्त्वाचे व्यक्ती मतदान जास्तीत जास्त होण्यासाठी आवाहन करत असतात. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनीही यंदा लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करावे, यासाठी आवाहन केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सरन्यायाधीशांनी हे आवाहन मराठीत केले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या एक्स अकाऊंटवर त्यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी मतदारांसाठी मराठीत खास संदेश दिला आहे. आपली ताकद ओळखून सर्वांनी मतदान करूया. संपूर्ण विश्वात भारत देशाला महान बनवूया, असे ते म्हणाले. याआधी त्यांनी इंग्रजीतही मतदानासाठी आवाहन केले होते. त्यानंतर त्यांचा हा मराठीतील संदेश समोर आला आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “निवडणुकीच्या दिवशी मतदान करणे हा आपला अधिकार तर आहेच, त्याशिवाय कर्तव्यही आहे. मला अजून आठवतं, जेव्हा मी पहिल्यांदा मतदानासाठी पात्र ठरलो. तेव्हा माझ्या मनात मतदानाविषयी उत्सुकता होती. संविधानाने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे, असे मला वाटले.”

‘या खेपेला पाच मिनिटं काढून नक्की मतदान करा’

“आज मी पाहतो की, आपली युवा पिढी मतदानाच्या दिवशी इतर कामात व्यस्त असते. पण मतदान करणे आपले कर्तव्य आहे. म्हणून मला सर्वांना विनंती करायची आहे की, सर्वांनी बाहेर पडून मतदान करावे. पाच वर्षांत आपण राष्ट्रासाठी पाच मिनिटं देऊ शकतो. या खेपेला पाच मिनिटं मतदानाला जरूर देऊया. कारण मतदान हा आपला आवाज आहे”, असेही ते म्हणाले.

१८ व्या लोकसभेसाठी १९ एप्रिल पासून १ जून पर्यंत सात टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. एकूण ५४३ लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे मराठी मातीशी नाते

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे मुळचे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर गावचे रहिवाशी आहेत. त्यांचा जन्म पुण्यातच झाला होता. चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथड्रल आणि जॉन कॅनन शाळेत झालं होतं. त्यांचे वडील स्व. यशवंतराव चंद्रचूड हे १९७८ ते १९८५ याकाळात सरन्यायाधीश होते. डीवाय चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयातही न्यायाधीश म्हणून काम केले होते. चंद्रचूड यांच्या कुटुंबात तीन पिढ्यांपासून विधी क्षेत्रात कार्य करण्याचा वारसा आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief justice of india dy chandrachud appeal to voters in marathi for 2024 lok sabha elections kvg