महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही वेळापूर्वीच एका मुलाखतीत अनेक प्रश्नांना त्यांच्या रोखठोक अंदाजात उत्तरं दिली आहेत. अजित पवार मागच्या वर्षी जुलै महिन्यात सत्तेत सहभागी झाले. त्यांनी सत्तेत जाण्याचा घेतलेला निर्णय शरद पवारांना पटला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार भाजपाच्या ट्रॅपमध्ये अडकले आहेत असा आरोप विरोधकांनी केला. त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. तसंच सुनेत्रा पवारांना उमेदवारी का दिली? त्यावरही भाष्य केलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

“भाजपाने सुनेत्रा पवारांचं नाव सुचवलं हे जे काही बोललं जातं आहे त्याला काहीही अर्थ नाही. हा धादांत खोटा प्रचार आहे. जागा वाटप झाल्यानंतर कुणाला उमेदवारी द्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला परभणीची जागा मिळाली होती. सोशल इंजिनिअरींगच्या दृष्टीने आम्ही ती रासपच्या महादेव जानकरांना दिली. आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला. तिथे आधी आम्ही राजेश विटेकरांना तिकिट देणार होतो. मात्र राजकारणात दोन पावलं-मागे पुढे घ्यावी लागतात.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी टीव्ही ९मराठी ला काही वेळापूर्वी मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी हे भाष्य केलं आहे.

भाजपाच्या ट्रॅपमध्ये अडकले का?

“कुणाला काय बोलायचं आहे ते बोलू द्या. मी काही कुणाच्या ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही. माझं काम रोखठोक असतं. मी लेचंपेचं काम करत नाही. राजकीय जीवनात जेव्हा वाटलं तेव्हा राजीनामा दिला आणि निघून गेलो. जे काही चित्र रंगवलं जातं आहे त्यामध्ये नखाइतकं किंवा तसूभरही सत्य नाही.” असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- मतदानाआधीच सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा, ‘या’ घोटाळ्यातून मिळाली क्लीन चिट!

“निवडणूक म्हटल्यावर यश अपयश असतं. आमच्या घरात जे काही झालं आहे ते आत्ताच झालेलं नाही. फार पूर्वी वसंतदादा पवार हे आमचे थोरले काका… आमचं अख्खं घराणं शेतकरी कामगार पक्षाचं होतं नवीन पिढीला माहीत नाही. नवीन बारामतीकरांना माहीत नाही. जुन्या बारामतीकरांना माहीत आहे. तेव्हा एकटे पवार साहेब काँग्रेससाठी काम करत होते. आख्खं घराणं आजी आजोबा, सर्व त्यांची मुली, मुलं सर्व मेंबर हे शेतकरी कामगार पक्षाचं काम करत होते. ही इतिहासाची नोंद आहे. १९६२चा काळ होता”, असं अजित पवार यांनी मुलाखतीत सांगितलं.