निवडणूक आयोगाने ८ जानेवारी २०२२ रोजी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. ५६ दिवसांच्या निवडणूक प्रचारादरम्यान सभांच्या बाबतीत काँग्रेसच्या उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सर्वात व्यस्त प्रचारक होते. प्रियांका गांधी यांनी २०९ तर योगी आदित्यनाथ यांनी २०३ एकूण सभा आणि रोड शो केले आहेत. मात्र प्रत्यक्ष निकालांमध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेस सर्वात पिछाडीवर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशात सपा अध्यक्ष अखिलेश यादव हे भाजपाचे मुख्य विरोधक म्हणून दिसत होते. अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात ११७ निवडणूक जाहीर सभांना संबोधित केले, तर १४ रोड शो देखील केले. अखिलेश यादव यांनी कमी रॅली काढल्या, मात्र त्यांच्या रॅलींना येणाऱ्या गर्दीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर बसपा प्रमुख मायावती यांनी केवळ १८ निवडणूक प्रचारसभांना संबोधित केले.

करोनाची तिसरी लाट पाहता निवडणूक आयोगाने सुरुवातीला जाहीर सभा आणि रोड शोवर बंदी घातली होती. पहिल्या काही टप्प्यात राजकीय पक्षांनी घरोघरी प्रचारावर भर दिला. मग करोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल झाले आणि राजकीय पक्षांनी मोठमोठ्या रॅली आणि रोड शोचे आयोजन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये २७ निवडणूक प्रचारसभांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातही रोड शो केला. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही भाजपाच्या मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या. भाजपाच्या निवडणुकीच्या तयारीवर बारकाईने लक्ष ठेवणारे अमित शाह यांनी उत्तर प्रदेशमध्ये ५४ सभांना संबोधित केले. तसेच राजनाथ सिंह यांनी ४३ सभांना संबोधित केले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही ४१ सभा आणि रोड शोला संबोधित केले होते.

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये प्रचार केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, योगी यांनी गोरखपूर शहरात रोड शोही केला, जिथून ते स्वतः निवडणूक लढवत आहेत. कौशांबी जिल्ह्यातील सिरथू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ८६ सभांना संबोधित केले. ओबीसी नेते केशव प्रसाद मौर्य यांच्या बहुतांश जाहीर सभा ओबीसीबहुल भागात आयोजित करण्यात आल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्षा आणि रायबरेलीच्या खासदार सोनिया गांधी सक्रिय प्रचारापासून दूर राहिल्याने, त्यांच्या कन्या आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या प्रचाराला पुढे नेले आणि त्यांनी १६७ सभांना संबोधित केले. त्यांनी ४२ रोड शो आणि घरोघरी प्रचाराचे नेतृत्व केले. प्रियांका गांधी यांनी जवळपास ३४० मतदारसंघांना संबोधित केले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वाराणसी आणि अमेठी या दोनच सभांना संबोधित केले. राहुल गांधी यांचा गेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून पराभव झाला होता.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही काँग्रेस पक्षाचा सक्रिय प्रचार केला. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनीही काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला. काँग्रेस नेते सचिन पायलट हे देखील उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारात सक्रिय होते. बसपा प्रमुख मायावती यांनी १८ सभांना संबोधित केले, तर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी ५५ सभांना संबोधित केले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite holding 209 rallies in uttar pradesh priyanka gandhi has no influence abn