Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक केवळ राजकीय नसून कौटुंबिकही आहे. अनेक मतदारसंघात कुटुंबातच लञत होत आहे. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातही एकाच घरात निवडणुकीची लढाई सुरू आहे. विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. तर, वृद्धापकाळामुळे गजानन कीर्तिकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. दरम्यान, आज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी गजानन कीर्तिकर हजर होते. त्यांनी टीव्ही ९ शी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी शिवसेना नेता म्हणून, एकनाथ शिंदेंबरोबर १३ खासदार आले त्यांच्यापैकी एक म्हणून, विद्यमान खासदार आणि वयाने ज्येष्ठ म्हणून राहुल शेवाळेंचा अर्ज भरण्यासाठी आणि त्यांना आशीर्वाद देण्याकरता येथे आलो आहे”, असं गजानन कीर्तिकर म्हणाले.

अमोल लढणार असेल तर मी लढणार नाही

“उत्तर पश्चिममध्ये (वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ) उद्धव ठाकरे यांनी अमोलची उमेदवारी जाहीर केली. अमोल निवडणूक लढवत आहे आणि मी तिथला विद्यमान खासदार आहे. पण मी विचार केला की मुलाच्या विरोधात लढणार नाही. समाज माध्यमात चुकीचा संदेश जाईल. इतके वर्षे राजकारणात असलेला बाप मुलाच्या विरोधात लढतोय. मला ती प्रतिमा डागाळू द्यायची नव्हती. तसं मी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना सांगितलं की अमोल लढणार असेल तर मी लढणार नाही”,असं गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा >> लोकसभा संग्राम सग्यासोयऱ्यांचा… वडील विरुद्ध मुलगा

“वडील काय आणि राजकारण काय वेगळं करून चालत नाही. मी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर आहे. अमोल उद्धव ठाकरेंबरोबर लढतोय. त्यामुळे माझं कर्तव्य आहे, राजधर्म आहे की मला अमोलच्या विरोधात माझ्या उमेदवारासाठी प्रचार करावा लागेल. उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल.

वडील म्हणून अमोल विजयी व्हावा असं वाटतंय का असं विचारल्यावर गजानन कीर्तिकर म्हणाले, वडील म्हणून वगैरे काही वाटत नाही. वडील म्हणून हे, पक्ष म्हणून ते, असा दुहेरी विचार करून चालत नाही.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I told eknath shinde that if amol is going to fight gajanan kirtikars statement sgk