Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 : हरियाणा व जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांचा निकाल मंगळवारी (८ ऑक्टोबर) जाहीर झाला. हरियाणामध्ये मतदानोत्तर चाचण्यांचे सर्व अंदाज खोटे ठरवत सलग तिसऱ्यांदा भाजपाने सत्ता कायम राखली आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘अब्दुल्ला’ सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या दोन्ही राज्यांमध्ये प्रभाव पाडण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरली आहे. भाजपाला जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता मिळवता आली नसली तरी या पक्षाने दोन्ही राज्यांमध्ये मोठा धमाका केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरकारविरोधातील वातावरण आणि काँग्रेसचा वाढता प्रभाव पाहता हरियाणात सत्तांतर होईल असे अंदाज वर्तवण्यात आले होते. मात्र त्यावर मात करून भाजपाने हरियाणाची निवडणूक जिंकली आहे. तर, अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक झाली. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसने ४८ जागा जिंकल्या आहेत. हरियाणात भाजपाने ९० पैकी ४८ जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे.

हरियाणा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी

हरियाणात भाजपाने ४८, काँग्रेसने ३७, लोकदलाने दोन जागा जिंकल्या आहेत. तसेच तीन अपक्ष उमेदवार ही निवडणूक जिंकले आहेत. भाजपाने २०१४ पेक्षा यंदा जास्त जागा जिंकल्या आहेत. तर जेजेपी व आपला एकही जागा जिंकता आलेली नाही.

भाजपाने राज्यात ५३.३ टक्के जागा जिंकल्या आहेत. तसेच राज्यात एकूण ३९.९ टक्के मतं मिळवली आहेत. दुसऱ्या बाजूला काग्रेसने ३९.०९ टक्के मतं मिळवली आहेत. २००९ नंतर पहिल्यांदाच काँग्रेसला हरियाणात इतकी मतं मिळाली आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने ९० पैकी ४० जागा जिंकल्या होत्या. तसेच त्यांना ३६.४९ टक्के मतं मिळाली होती. तर काँग्रेसला ३१ जागा जिंकता आल्या होत्या. तेव्हा त्यांना २८,०८ टक्के मतं मिळाली होती.

जम्मू आणि काश्मीर निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी

जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने ९० पैकी ४२ जागा जिंकल्या आहेत. हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तर, एनसीच्या मित्रपक्षाने म्हणजेच काँग्रेसने ६ जागा जिंकल्या आहेत. मेहबुबा मुफ्तींच्या पीपल्स डेमेक्रॅटिक पार्टीने ३ जागा जिंकल्या आहेत. जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) आणि आम आदमी पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. सात अपक्ष उमेदवारही जिंकले आहेत.

राज्यात नॅशनल कॉन्फरन्सला २३.४३ टक्के मतं मिळाली आहेत. तर भाजपाला २५.६४ टक्के मतं मिळाली आहेत. काँग्रेसने ११.९७ टक्के मतं मिळवली आहेत. जम्मू काश्मीरमध्ये भाजपाची मतं आणि आमदारांची संख्या वाढली आहे. २०१४ मध्ये नॅशल कॉन्फरन्सचे १५ आमदार होते जे आता ४२ झाले आहेत. तर काँग्रेसच्या आमदारांची संख्या १२ वरून ७ वर आली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu and kashmir assembly election result 2024 bjp vote share more than nc and congress asc