महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांसह देशभरातील ९३ मतदारसंघात आज (७ मे) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान चालू आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, बिहार, आसाम, छत्तीसगड, कर्नाटकसह १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात मतदान चालू आहे. दरम्यान, मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातल्या अनेक मतदारसंघातील विरोधी पक्षांमधील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सत्ताधारी पक्षांमधील उमेदवारांनी मतांसाठी पेसे वाटल्याचे दावे ऐकायला मिळत आहेत. सर्वात आधी बारामती मतदारसंघात पैसेवाटप झाल्याचा आरोप करण्यात आला. बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील स्थानिक नेत्यांनी अजित पवार गटावर पैसे वाटल्याचे आरोप केले. तसेच याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.

याप्रकरणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटावर मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. पाठोपाठ त्यांनी समाजमाध्यमांवर काही व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैसेवाटप होत असल्याचा दावा करत रोहित पवारांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर चार व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच बारामतीत रात्री १२ नंतरही पुणे मध्यवर्ती बँकेचं कामकाज चालू असल्याचा एक व्हिडीओ रोहित पवार यांनी शेअर केला आहे.

रोहित पवारांपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. आव्हाड म्हणाले, अजित पवार हे त्यांच्या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैशांचं अमिष दाखवून मतं खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे ही वाचा >> काँग्रेसवाल्यांकडेच कोट्यवधींची रोकड कशी सापडते? पंतप्रधानांच्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “तुम्ही तर…”

जितेंद्र आव्हाड म्हणाले, आपण बारामतीची लढाई हरतोय असं दिसल्यावर अजित पवार यांनी आज नवीन डाव टाकला. त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील त्यांच्या जवळच्या माणसांद्वारे मतदारांना पैसे देऊन मतं खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या कारखान्याचे अध्यक्ष जगताप वगैरे सगळी मंडळी अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. हे लोक १०० रुपयात शेतकऱ्याला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सोमेश्वर नगर परिसरातील २४ हजार शेतकरी त्या कारखान्याचे सदस्य आहेत. त्यांना पैशाची लालच दाखवून मतं मिळवण्याचा अजित पवार गटाकडून प्रयत्न होत आहे. अजित पवार गटातील लोक आपल्या साखर कारखान्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार आहेत. अशा कितीही शकला लढवल्या तरी तुम्हाला विजय मिळणार नाही हे सर्वांना माहिती आहे.