पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या “यूपी, बिहार आणि दिल्ली दे भैये” या विधानावरून काँग्रेसवर निशाणा साधला. अशा “विभाजवादी विचारांच्या” लोकांनी गुरुंचा अपमान केला आहे आणि त्यांना राज्यावर राज्य करण्याचा अधिकार नाही. असं मोदींनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अशा विधानांनी त्यांनी (चन्नी) उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांचाच नव्हे तर गुरु रविदास आणि गुरु गोविंद सिंग यांचाही अपमान केला आहे. काल ज्यांची जयंती साजरी झाली, अशा गुरु रविदासांचा जन्म कुठे झाला होता? त्यांचा जन्म पंजाबमध्ये झाला होता का? त्यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या वाराणसीत झाला आणि तुम्ही यूपीच्या ‘भैय्या’ला इथे येऊ देणार नाही? तुम्ही रविदासियांना (गुरु रविदासांचे अनुयायी) हाकलून द्याल का? तुम्ही संत रविदासांचे नावही पुसून टाकाल का?”, असा सवाल पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांना केला आहे.

तसेच, पंतप्रधानांनी पुढे विचारले की गुरु गोविंद सिंग यांचा जन्म कुठे झाला होता. “त्यांचा जन्म बिहारमधील पटना साहिब येथे झाला आणि तुम्ही म्हणता तुम्ही बिहारच्या लोकांना आत येऊ देणार नाही. मग तुम्ही गुरु गोविंद सिंग यांचा अपमान कराल का? ज्या भूमीवर गुरु गोविंद सिंग यांचा जन्म झाला त्या भूमीचा अपमान कराल का?” असं देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं.

“उत्तर प्रदेश, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका”; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने गदारोळ

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जोरदार प्रचार सुरु असताना मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला आहे. उत्तर प्रदेश, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका असं चरणजीत सिंग चन्नी यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रियंका गांधी त्यांच्या बाजूला उभ्या होत्या. या वक्तव्यावर त्यांनीदेखील हास्यमुद्रा देत टाळ्या वाजवल्याने आता यावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. भाजपाने व काँग्रेसच्या विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ, आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab election 2022 prime minister modi targets on cm channys statement msr