लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीतल्या महत्त्वांच्या नावांपैकी एक नाव म्हणजे अरुण गोविल यांचं. रामायण या रामानंद सागर दिग्दर्शित मालिकेत रामाची भूमिका केल्याने घराघरांत पोहचलेले अरुण गोविल यांना भाजपाने लोकसभा निवडणुकीचं तिकिट दिलं आहे. मेरठ लोकसभा मतदारसंघातून अरुण गोविल निवडणूक लढवणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेरठमधून लढवणार निवडणूक

काही वेळापूर्वीच भाजपाची पाचवी यादी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी जाहीर केली. या यादीत महत्त्वाची नावं आहेत. कंगना रणौतचंही नाव याच यादीत आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातल्या मंडी या ठिकाणाहून लोकसभेचं तिकिट भाजपाने दिलं आहे. रामायण मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात प्रभू रामाचं स्थान निर्माण करणाऱ्या अरुण गोविल यांना तिकिट देण्यात आलं आहे. मेरठमधून ते लोकसभा निवडणूक लढवतील.

शनिवारी यादीवर शिक्कामोर्तब

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शनिवार २३ मार्च रोजी दिल्लीत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीला भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यावेळीच भाजपच्या पाचव्या यादीतील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

हे पण वाचा- अभिनेत्री कंगना रणौत राजकारणात! भाजपाने ‘या’ मतदारसंघातून दिलं लोकसभेचं तिकिट

अरूण गोविल २०२१ मध्ये भाजपात

देशसेवा करायची असल्याने मी राजकारणात आलो असं अरुण गोविल यांनी २०२१ मध्ये भाजपा प्रवेशाच्या वेळी म्हटलं होतं. २०२१ मध्ये त्यांना कोणती जबाबदारी दिली जाणार हे स्पष्ट झालेलं नव्हतं. मात्र आता काही वेळापूर्वीच त्यांना मेरठमधून उमेदवारी देण्यात आली आहे. रामायण या मालिकेमुळे देशासह जगभरात अरुण गोविल यांना प्रसिद्धी मिळाली आहे. आता या प्रसिद्धीचा उपयोग भाजपा करुन घेईल यात शंकाच नाही. अरुण गोविल यांनी साकारलेल्या प्रभू रामाची प्रतिमा आजही लोकांच्या मनात कायम आहे. आता भाजपाने त्यांना मेरठहून तिकिट दिलं आहे त्या ठिकाणी काय होणार हे पाहणं रंजक असणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramayana lord ram fame actor arun govil gets tickit to loksabha elections scj