लोकसभा निवडणुकीत बारामती या मतदारसंघाने लक्ष वेधलं आहे. कारण इथला सामना सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा आहे. अशातच रविवारी शरद पवार यांची प्रकृती बिघडली. शरद पवार यांनी स्वतःच त्याबाबत सांगितलं होतं की त्यांनी ४० सभा घेतल्या आहेत. शरद पवारांचं वय हे ८३ च्या घरात आहे. तरीही ज्या उत्साहाने ते फिरत आहेत तो वाखाणण्याजोगा आहे. अशात शरद पवारांची प्रकृती बिघडल्याने त्यांचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

शरद पवारांना नेमकं काय झालं आहे?

रविवारी शरद पवारांनी तीन मोठ्या सभा घेतल्या. बारामतीतली सभा संपेपर्यंत त्यांची प्रकृती बिघडली. घसा बसल्याने त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. तसंच त्यांच्या चेहऱ्यावरही प्रचंड थकवा जाणवत होता. यानंतर त्यांनी गोविंदबाग या ठिकाणी जाऊन आराम केला. आजचे त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रविवारी रात्री शरद पवार गटाने ही घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनावणेंनी एक पोस्ट शेअर केली आहे. तुम्ही प्रकृतीला जपा विजय तुमच्या पायाशी आणून ठेवतो असं बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे. ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

काय आहे बजरंग सोनावणेंची पोस्ट?

साहेब, तब्येतीला जपा!
तब्बेतीच्या कारणास्तव माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही..

तुमची तब्बेत खराब झाल्याचे कळले. मागील पाच-सहा दशके अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील तुम्ही. तुमच्या नावावरच झाल्या त्या! मागील कित्येक दशके महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला अभिमानानं आव्हान देतो. पण साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्बेतीला जपा.

हे पण वाचा- बारामतीत प्रचाराची सांगता वाक्युद्धाने ; शरद पवार यांचा इशारा‘सत्तेचा गैरवापर केल्यास, दमदाटी करणाऱ्यांना जागा दाखवू’

लढणं, तेही विपरीत परिस्थितीत, तुम्ही या देशाला दाखवून दिलंय. विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! आता पुढची जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच लढू द्या! साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त, तब्येतीला जपा साहेब. आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहुद्या.

~ तुमचा,
बजरंग बप्पा!

बारामतीत मंगळवारी मतदान

लोकसभा निवडणुकीत सर्वात हायव्होल्टेज मतदारसंघ असलेल्या बारामतीत प्रचाराचा शेवटचा दिवस रविवारी होता. ७ मे म्हणजेच मंगळवारी बारामतीत मतदान होणार आहे. रविवारी संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. बारामतीचा गड राखण्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. अशात त्यांची प्रकृती बिघडल्याने आज त्यांनी सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत.