Maharashtra Latest Political News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा ठरलेला कल्याण लोकसभा मतदारसंघात अखेर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. श्रीकांत शिंदे सध्या या मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून त्यांना पुन्हा दिल्लीत पाठवण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. परंतु, भाजपाच्या स्थानिक पातळीवरील विरोधामुळे त्यांचं नाव जाहीर होण्यास विलंब झाला. अखेर, खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच माध्यमांसमोर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील पेच संपुष्टात आला. दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला.

श्रीकांत शिंदे म्हणाले, “कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विषय क्लिअर होता. कल्याणमध्ये युतीचे कार्यकर्ते, नेत्यांच्या बैठका, गाठीभेटींना सुरुवात झाली आहे. मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सगळे मिळून एकदिलाने कामाला लागले आहेत. प्रचाराला सुरुवात झाली आहे. मी फडणवीसांचं स्वागत करतो. कल्याण लोकसभेमधून मी मोठ्या मताधिक्क्याने जिंकून येईन.

हेही वाचा >> कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड श्रीकांत शिंदे वादाची पुन्हा ठिणगी, गायकवाड समर्थकांचा शिंदेंचे काम न करण्याचा निर्धार

कल्याण पूर्वचे शहरप्रमुख खासदार शिंदे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यापासून आमदार गणपत गायकवाड तुरुंगात आहेत. शहरप्रमुख गायकवाड यांच्या कृत्यामुळे आमदार गायकवाड यांना गोळीबार आणि तुरुंगात जावे लागल्याची भाजपा कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार किंंवा कमळ चिन्हावर लढणारा उमेदवार असेल तर त्याचे काम आम्ही करू अशाप्रकारचे सह्यांचे एक निवेदन आमदार गायकवाड समर्थकांकडून भाजप प्रदेशाध्यक्षांना पाठविण्यात येणार आहे, असे एका आमदार गायकवाड समर्थकाने सांगितले. कोणत्याही परिस्थितीत कल्याण पूर्वेतील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता हा श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही, अशी चर्चा आम्ही केली असल्याचे या कार्यकर्त्याने सांगितले. दरम्यान यावरून श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा >> Lok Sabha Election 2024: कल्याणमधून श्रीकांत शिंदेच महायुतीचे उमेदवार, देवेंद्र फडणवीसांनी केलं शिक्कामोर्तब; म्हणाले, “भाजपाकडून…”

ते म्हणाले, विरोध करणाऱ्यांचा काही वैयक्तिक अजेंडा असेल तर तो त्यांनी वैयक्तिकरित्या राबवला पाहिजे. पक्षाचं नाव घेऊन युतीचं वातावरण खराब करू नये. गुंडं प्रवृत्तीने कोणी वागत असतील तर त्यांचा काय अजेंडा आहे, हे स्पष्ट झालं पाहिजे. कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. राज्य सरकार, केंद्र सरकारने मदत केली आहे. परंतु, यांचा अजेंडा वातावरण खराब करण्याचा आहे.

हेही वाचा >> कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी

कल्याण लोकसभा मतदारसंंघात श्रीकांत शिंदेंचा अपप्रचार

कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड समर्थक म्हणून मिरविणाऱ्या पण ते भाजपचे नसावेत, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात अपप्रचार केला जात आहे. यामुळे महायुतीत काही लोक घोळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कार्यकर्त्यांचा भाजपच्या वरिष्ठांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.