पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये होते. त्यांच्यावर खूप ताण पडला आहे. ते झोपत नाहीत असं मला कुणीतरी सांगितलं. झोप अपुरी झाली तर डॉक्टर सांगतात की मेंदूवर परिणाम होतो आणि लोक काहीवेळा भ्रमिष्टासारखे बोलायला लागतात. मोदींना कदाचित कल्पना नसेल हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरीही काही पावटे आपल्या शिवसेनेला नकली म्हणत आहेत. त्यांना कुठे मोड फुटलेत माहीत नाही. असं म्हणत नाशिकच्या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर आणि भाजपावर टीका केली. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. त्या सभेत त्यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“आत्ता या पावट्यांची मजल इतकी गेली आहे की तेलंगणाच्या भाषणात मला नकली संतान म्हणाले आहेत. मी काय यांना बर्थ सर्टिफिकेट मागितलेलं नाही. तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतारही नाहीत. आज तुम्ही चोराच्या हातात धनुष्यबाण दिला आहेत पण मशाल कशी पेटली आहे तुम्हीच बघा. त्यांना प्रश्न असा पडला आहे की देशाची फौज मोदींकडे आहे. भाजपाच्या तिनपाटांपासून ते भांड्याकुंड्यापर्यंत अनेक लोक आहेत. माझ्याभोवती माँच्या आशीर्वादाचं कवच आहे, तसंच या लोकांचं अभेद्य कवच आहे. मला काहीही होणार नाही. मी व्यक्तिगत टीका करत नाही. पण भाजपाला राजकारणात पोरंच होत नाहीत. त्यामुळे आपल्याकडची नकली संतान मांडीवर घ्यावी लागते” असा खोचक टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

नकली संतान दत्तक घ्यावी लागते आहे

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “एका बाजूला, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. नकली संतान दत्तक घ्यायची. एक वाह्यात नकली संतान मोदींनी मांडीवर घेतली आहे. त्याचं नाव प्रफुल्ल पटेल. महाराजांचा जिरेटोप मंगळवारी घातला. आज शेतकरी दादांची टोपी घातली रोज टोप्या बदलणारा माणूस तुम्हाला पंतप्रधान म्हणून हवा आहे? जरी तुम्ही पटेल असाल तरी असं काही कराल तर जनता तुम्हाला आपटेल. जिरेटोप कुणाच्या डोक्यावर ठेवता? मोदींच्या? त्यांची पात्रता काय महाराजांची बरोबरी करण्याची? थोडी तरी पात्रता आहे का?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

हे पण वाचा- देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप, “उद्धव ठाकरेंच्या सभेत पाकिस्तानचा झेंडा फडकत होता, मतांसाठी…”

मोदींची महाराजांच्या जिरेटोपाकडे पाहण्याचीही पात्रता नाही

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही दैवत मानतो. त्यांचं राज्य कसं चालायचं? महिलेवर अत्याचार झाला तर चौरंग केला जायचा. मोदी काय करत आहेत? मणिपूरमध्ये जाण्याची हिंमत नाही. जिथे माझे महाराज महिलांचा अपमान झाला तर शिरच्छेद करायचे मोदी तर मणिपूरला जाऊ शकत नाही. मोदी तुमची महाराजांचा जिरेटोप घालण्याची नाही तर त्याकडे पाहण्याचीही पात्रता नाही. मोदी कुणाचा प्रचार करत आहेत? प्रज्ज्वल रेवण्णाचा. त्याचे व्हिडीओ फिरत आहेत. असा ज्या व्यक्तीचा उमेदवार तो महाराजांचा जिरेटोप कसा घालू शकतो? बलात्कार करणारा माणूस यांचा उमेदवार आहे. मोदी निर्ल्लजपणे सांगत आहेत की रेवण्णाला मत म्हणजे मला मत. प्रफुल्ल पटेल यांनी महाराजांचा अपमान केला आहे. जो महाराजांचा अपमान करेल त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही हे याद राखा.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.