– ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फिरकी गोलंदाजीची ताकद आणि पाहुण्या संघाची फिरकी खेळण्याची कमतरता लक्षात घेऊन भारताने फिरकी गोलंदाजीस पोषक अशाच खेळपट्ट्या बनवल्या. पहिल्या दोन जिंकल्या,पण अशाच खेळपट्टीवर तिसरा सामना गमावला. खेळपट्टी हा एक भाग झाला; ती कधीच विजयाची हमी देऊ शकत नाही. त्यासाठी जिंकण्याची जिद्द आणि मानसिकता असावी लागते. तिसऱ्या कसोटीत भारतीय ते दाखवू शकले नाहीत. आता यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामना खेळण्याचा भारताचा मार्ग कठीण झाला असे म्हणता येऊ शकेल.

फिरकी खेळपट्टीच्या जाळ्यात भारतीय फलंदाज?

भारताने गेल्या दशकात मायदेशात फक्त तीन कसोटी सामने गमावले आहेत. यामध्ये पुणे २०१७, चेन्नई २०२१ आणि आता इंदूर २०२३ या सामन्यांचा समावेश आहे. यात पुणे आणि इंदूरच्या पराभवात साम्य म्हणजे दोन्ही सामन्यात स्टिव्ह स्मिथ कर्णधार होता आणि दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाचे फिरकी गोलंदाज वरचढ ठरले होते. अर्थात, कोणतीही खेळपट्टी घरच्या संघाला विजयाची हमी देऊ शकत नाही. जेव्हा खेळपट्टी ही गोलंदाजांना पूर्ण फायदा करून देणारी बनवली जाते (मग ती वेगवान किंवा फिरकी गोलंदाजांसाठी) तेव्हा ती एक दिवस पाहुण्या संघालाही विजयाचा मार्ग दाखवते. ही कसोटी याचे उत्तम उदाहरण तर आहेच, पण दुसऱ्या दिल्ली कसोटीतही भारतीय संघ अडचणीत आला होता. तळाचे फलंदाज खेळले म्हणून भारतीय संघ बचावला हे विसरून चालणार नाही.

भारतीय संघ प्रतिआक्रमण करण्यास कमी पडला का?

दोन्ही डावांत भारतीय फलंदाज अपयशी ठरले. अर्थात, मालिकेत फलंदाजांनी फार मोठी कामगिरी केली आहे अशातला भाग नाही. सलामीची जोडी बदलल्यावरही भारताला चांगली सलामी मिळाली नाही. त्यामुळे उर्वरित फलंदाज बचावात्मक खेळायला गेले आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्याचा फायदा उठवला. ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी शेवटपर्यंत राखलेला टप्पा कमाल होता. भारतीय फिरकी गोलंदाज तो टप्पा राखू शकले नाहीत. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजी खेळण्याची ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दाखवलेली मानसिकताही महत्त्वाची होती. स्वीपच्या फटक्यांमुळे टीका झाल्यावर तिसऱ्या कसोटीत त्यांचे फलंदाज अधिक करून समोर म्हणजे ‘व्ही’ मध्ये खेळले. फिरकी गोलंदाजी आम्हीही खेळू शकतो ही त्यांनी दाखवलेली मानसिकताच महत्त्वाची होती. ट्राविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी आव्हानाचा पाठलाग करताना दाखवलेली आक्रमकता भारतीय फलंदाज कधीच दाखवू शकले नाहीत. भारताच्या प्रमुख फलंदाजांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव होता.

प्रमुख फलंदाजांचे अपयश कारणीभूत ठरले का?

या मालिकेत भारताचे प्रमुख फलंदाज आपली छाप पाडू शकलेले नाहीत. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा वगळता एकही फलंदाज आपल्या गुणवत्तेला न्याय देऊ शकलेला नाही. मधली फळी तर साफ अपयशी ठरली. विराट कोहली फिरकी गोलंदाजी चांगली खेळू शकतो, पण तोही प्रभाव पाडू शकला नाही. आघाडीच्या आणि मधल्या फळीच्या फलंदाजांचे अपयश भारतासाठी निश्चित चिंतेचा विषय आहे. तळातील फलंदाजांनी त्यांना दोन्ही कसोटीत हात दिला. दोन्ही कसोटीत फिरकी गोलंदाज फलंदाजीतही भारताच्या उपयोगी पडले हे सत्य आहे. इंदूरमध्ये भारताचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. आता तिसऱ्या कसोटीत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना खेळावेच लागेल.

अक्षर पटेलचा वापर करण्यात अपयश?

डावखुरा फलंदाज अक्षर पटेलचा वापर करण्यात भारतीय संघ चुकला. अक्षर पटेलमधील अष्टपैलूत्वाला भारतीय संघ व्यवस्थापन न्याय देऊ शकले नाही. गोलंदाज म्हणून अधिक उपयोग करून घेण्यापेक्षा त्याच्याकडे फलंदाज म्हणूनच अधिक बघितले गेले. फलंदाज म्हणूनही त्याने या मालिकेत आपली छाप पाडली. जेव्हा फलंदाज म्हणून त्याच्याकडे बघायला हवे होते; तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले. अक्षरने मालिकेत चांगली फलंदाजी केली. इंदूरमध्येही तो चांगला खेळत होता. जडेजा अखेरच्या तीन डावात लायनला नीट खेळू शकत नव्हता. अशा वेळी अक्षर पटेलला बढती मिळणे अपेक्षित होते. फलंदाजीच्या क्रमवारीत लवचिकता न दाखविल्यामुळेही भारताला तिसऱ्या कसोटीत किमान ५० धावांना मुकावे लागले.

हेही वाचा : विश्लेषण : महिला प्रीमियर लीग भारतीय महिला क्रिकेटसाठी नवसंजीवनी ठरेल का? कुठल्या संघांकडून अपेक्षा असतील?

भारतासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळण्याचे समीकरण कसे असेल?

ऑस्ट्रेलियाने तिसरा कसोटी सामना जिंकून जागतिक कसोटी सामन्याच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या पराभवाने श्रीलंका संघाच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या मालिकेत भारताला १८ सामने खेळायचे होते. या पैकी १७ सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धची अखेरची कसोटी ही भारतासाठी अखेरची संधी असेल. हा सामना भारताला जिंकावाच लागेल. सामना भारताने गमावल्यास किंवा अनिर्णीत राहिल्यास श्रीलंकेच्या आशा पल्लवित होतील. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत श्रीलंका हरल्यास भारत पात्र ठरेल. श्रीलंकेने मालिका २-० अशी जिंकल्यास ते अंतिम फेरी खेळतील.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analysis of defeat of team india in test cricket and effect on number one ranking print exp pbs