scorecardresearch

विश्लेषण : महिला प्रीमियर लीग भारतीय महिला क्रिकेटसाठी नवसंजीवनी ठरेल का? कुठल्या संघांकडून अपेक्षा असतील?

‘डब्ल्यूपीएल’ पहिल्या सत्रात कोणते संघ मजबूत आहेत, तसेच कोणत्या खेळाडूंवर या लीगदरम्यान लक्ष असेल, याचा घेतलेला हा आढावा..

Women Premier League WPL Cricket
महिला प्रीमियर लीग (पीटीआय)

– संदीप कदम

महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) माध्यमातून भारतीय महिला क्रिकेटच्या नवीन पर्वाला शनिवारी सुरुवात झाली. २३ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पाच संघ असून दोन बाद फेरीचे सामने होतील. या लीगचे सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये पार पडतील. स्पर्धापूर्वी झालेल्या लिलावात अनेक भारतीय खेळाडूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. त्यामुळे लीगबद्दल सर्वांची उत्सुकता वाढली आहे. ‘डब्ल्यूपीएल’ पहिल्या सत्रात कोणते संघ मजबूत आहेत, तसेच कोणत्या खेळाडूंवर या लीगदरम्यान लक्ष असेल, याचा घेतलेला हा आढावा..

कोणकोणते संघ ‘डब्ल्यूपीएल’मध्ये सहभागी होणार आहेत?

महिला प्रीमियर लीगमधील (डब्ल्यूपीएल) पहिल्या पर्वात दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स हे संघ सहभागी झालेत. दिल्लीचे कर्णधारपद मेन लॅनिंगकडे आहे. तर, मुंबईचे नेतृत्व हरमनप्रीत कौर, बंगळुरुचे स्मृती मनधाना, गुजरातचे बेथ मूनी आणि यूपी वॉरियर्सचे नेतृत्व एलिसा हीली करेल. या स्पर्धेत तीन संघांचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडे आहे. तर, दोन संघांचे नेतृत्व भारतीय खेळाडू करतील. या स्पर्धेच्या साखळी फेरीत एकूण २० सामने होतील. साखळी फेरीनंतर गुणतालिकेत अग्रस्थानी असलेला संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर, दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी असलेल्या संघात २४ मार्चला ‘एलिमिनेटर’ सामना होईल. या सामन्यातील विजयी संघ २६ मार्चला ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात खेळेल.

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स संघांची क्षमता कशी आहे?

दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व लॅनिंगकडे आहे. जेमिमा रॉड्रिग्ज संघाची उपकर्णधार असेल. संघात शफाली वर्मा, मारिजान कॅप, एलिस कॅप्सी, जेस जोनासेन, राधा यादव आणि शिखा पांडे या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. संघात सहा अष्टपैलूंचा समावेश आहे. त्यातील पाच खेळाडू दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. संघातील महत्त्वाचे खेळाडू वगळल्यास इतर खेळाडूंकडे अनुभवाची कमतरता आहे. आघाडीच्या खेळाडूंपैकी कोणीही जायबंदी झाल्यास संघाच्या अडचणी वाढू शकतात. या लीगमध्ये सर्वाधिक लक्ष भारताची आक्रमक सलामीवीर शफाली आणि जेमिमाकडे असेल. दुसरीकडे, गुजरात जायंट्स संघाकडे चांगल्या अष्टपैलूंचा भरणा आहे. महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ॲश्ले गार्डनर आणि अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू बेथ मूनी यांचा समावेश गुजरात संघात आहे. संघात जॉर्जिया वेअरहॅम, स्नेह राणा, ॲनाबेल सदरलँड, डिआंड्रा डॉटिन, मानसी जोशी आणि हरलीन देओल सारख्या आघाडीच्या खेळाडू आहेत. विदेशी फलंदाज, भारतीय फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असल्याने संघ मजबूत दिसत आहे. संघात चांगल्या वेगवान गोलंदाजाचा अभाव आहे. यासह फलंदाजी फळीत स्थानिक फलंदाज नाहीत. त्यामुळे सामन्यांदरम्यान त्यांना सर्वस्वी अष्टपैलू खेळाडूंवर सर्वाधिक अवलंबून रहावे लागेल.

यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघांचे वैशिष्ट्य काय?

यूपी वॉरियर्स संघात कर्णधार एलिसा हीलीसह तहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस सारख्या ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू आहेत. तसेच, दक्षिण आफ्रिकेकडून अंतिम सामन्यात सहभाग नोंदवणारी शबनिम इस्माइलचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश असल्याने संघाची फलंदाजी भक्कम दिसत आहे. स्थानिक फिरकी गोलंदाजांमुळे संघाला मजबूती मिळेल. त्यामुळे सध्या तरी यूपीचा संघ संतुलित दिसत आहे. दुसरीकडे, लीगच्या लिलावात सर्वाधिक बोली लागलेली खेळाडू ठरलेल्या स्मृती मनधाना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची धुरा सांभाळतील. मनधानाशिवाय संघात सोफी डिवाइन, हेदर नाइट, एलिस पेरी, डॅन व्हॅन निकर्क, रिचा घोष, मेगन शुट आणि रेणुका सिंह ठाकुरसारखे आघाडीचे खेळाडू आहेत. या लीगमधील सर्वात भक्कम फलंदाजी फळी ही बंगळुरुची आहे. मात्र, संघात कोणतीही भारतीय फिरकी गोलंदाज नाही. तसेच, अष्टपैलू खेळाडूंमध्येही कोणतेही मोठे नाव नाही. त्यामुळे गोलंदाजीच्या आघाडीवर संघ काहीस कमकुवत भासत आहे.

हेही वाचा : विश्लेषण : वेंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा यांच्यात शाब्दिक सामना का? के. एल. राहुलवरून टोकाचे मतभेद?

हरमनप्रीच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स चमकदार कामगिरी करेल का?

‘आयपीएल’मधील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सचा संघ ओळखला जातो. त्यामुळे ‘डब्ल्यूपीएल’मध्येही संघाला यशस्वी बनवण्याची जबाबदारी हरमनप्रीतच्या खांद्यावर असेल. हरमनप्रीतच्या क्षमतेबद्दल कोणालाही दुमत नाही. तसेच, तिच्या नेतृत्वगुणाची कल्पनाही सर्वांना आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील तिचा अनुभवही दांडगा असल्याने मुंबईला चांगली कामगिरी करायची झाल्यास हरमनप्रीतवर संघाची मदार असेल. हरमनप्रीतशिवाय संघात क्लोए ट्रायॉन, अमालिया कर, नटाली स्किव्हर-ब्रंट आणि पूजा वस्त्राकारसारख्या खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंमध्ये कठीण परिस्थितीतही संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता आहे. संघाकडे वेगवान गोलंदाजांची कमतरता आहे. तसेच, संघात स्थानिक खेळाडूंचा भरणाही अधिक आहे. त्यामुळे संघाचे संतुलन निर्माण करताना व्यवस्थापनाचा कस लागेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 08:30 IST