हृषिकेश देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिणेतील पाच राज्यांत लोकसभेच्या १३० जागा आहेत. त्यापैकी केवळ २९ जागा भाजपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकता आल्या. यामध्ये कर्नाटकमधील २५, तर तेलंगणातील चार जागांचा समावेश आहे. मात्र यंदा भाजपने तमिळनाडू तसेच केरळवर लक्ष केंद्रित केले आहे. याखेरीज आंध्र प्रदेशात भाजपने माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसमशी आघाडी केली.

दक्षिणेत काय परिस्थिती?

दक्षिणेतील तमिळनाडूत ३९ तसेच शेजारच्या पुदुच्चेरीत १, कर्नाटक २८, आंध्र प्रदेश २५, केरळ २० तसेच तेलंगणात १७ अशा लोकसभेच्या जागा येतात. उत्तर तसेच पश्चिम भारतात भाजपकडे सध्या ९० टक्के जागा असल्याने त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाही. यामुळेच दक्षिणेत २९वरून ४५ वर मजल मारण्यासाठी भाजपने सारे प्रयत्न चालवलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी पहिल्या साडेतीन महिन्यांत तमिळनाडू आणि केरळमध्ये जवळपास सहा ते सात वेळा दौरे केले. यावरून दक्षिण भारत यंदा भाजपसाठी किती महत्त्वाचा हे लक्षात येते. हिंदी भाषिक पट्ट्यातील पक्ष अशी भाजपची ओळख यंदा पुसली जाईल का, केरळमध्ये लोकसभेला पक्ष खाते उघडणार काय, याची चर्चा सध्या सुरू आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : यंदा दमदार पावसाचा अंदाज का वर्तवला जात आहे?

तमिळनाडूत दीर्घकालीन योजना

तमिळनाडूतील राजकारण गेली सहा दशके द्रमुक-अण्णा द्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांभोवतीच केंद्रित झाले. १९६७ मध्ये राज्यात काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेस, भाजप या राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांचे दुय्यम भागीदार म्हणून वावरावे लागते. यंदा भाजपने राम मंदिर उभारणीनंतर निर्माण झालेले हिंदुत्वाचे वातावरण, काशी तमिळ संगम, सौराष्ट्र तमिळ संगम अशा या संस्कृतीशी जोडणाऱ्या उपक्रमांचा भर. यामुळे राज्यात भाजपची नवी मतपेढी निर्माण झाली. त्यातच प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या रूपात भारतीय पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात उतरलेल्या तरुणाने राज्यभरात पक्षासाठी वातावरण तयार केले. पक्षाने इतर मागासवर्गीय समाजातून अधिकाधिक नेते पुढे आणले. याचा परिणाम तमिळनाडूतील राजकारणावर झाला. धनुषकोडीच्या उत्तरेला २०-२० किमी अंतरावरील कच्छथीवू बेट श्रीलंकेला दिल्याचा मुद्दा पंतप्रधानांनी ३१ मार्च रोजी उपस्थित केला. राज्यभर यावरूनही काँग्रेस तसेच पर्यायाने द्रमुकला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला.

आघाडीत मोठी भूमिका

भाजप यंदा लोकसभेला आघाडीत थोरल्या भावाची भूमिका बजावत आहे. अण्णा द्रमुक राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यावर भाजपने छोट्या पक्षांना बरोबर घेऊन द्रमुक तसेच अण्णा द्रमुक आघाडीला पर्याय देण्याचा प्रयत्न केला. केवळ पट्टल मक्कल काची हा राज्याच्या उत्तर भागात बऱ्यापैकी स्थान असलेला स्थनिक पक्ष या आघाडीत आहे. राज्यातील ३९ पैकी २० जागा भाजप स्वबळावर तर तीन ठिकाणी मित्रपक्षाचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढत आहेत. भाजप आघाडीतील अन्य पक्ष हे एक किंवा दोन मतदारसंघांपुरतेच मर्यादित आहेत. भाजपचे लक्ष्य हे लोकसभेबरोबरच २०२६ च्या विधानसभा निवडणुकीवर आहे. त्यासाठी दीर्घकालीन रणनीती आखली जात आहे.

मर्यादित जागांवर लक्ष्य

द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीचा सामाजिक आधार व्यापक आहे. यात काँग्रेस तसेच डावे पक्ष प्रामुख्याने आहेत. विशेषत: राज्यातील अल्पसंख्याकांची सात टक्के मते जवळपास एकगठ्ठा या आघाडीमागे आहेत. गेल्या वेळी द्रमुक आघाडीने ३८ जागा जिंकल्या होत्या. तर भाजप आघाडीला एक जागा मिळाली. अण्णा द्रमुकने ही जागा जिंकली होती. आता अण्णा द्रमुक हे दिवंगत अभिनेते विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षाबरोबर रिंगणात उतरले आहे. द्रमुक-अण्णा द्रमुक यांच्या संघर्षात भाजपने राज्यातील पाच ते सहा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करून प्रचार केला.

यात भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई हे निवडणूक लढवत असलेला कोईम्बतूर याखेरीज दक्षिण चेन्नई या मतदारसंघातून माजी प्रदेशाध्यक्ष तमिळसाई सौंदरराजन या रिंगणात आहेत. याअंतर्गत येणाऱ्या तीन विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण मतदार मोठ्या संख्येने आहेत. भाजप येथे विजयाची अपेक्षा बाळगून आहे. येथे पंतप्रधानांचा रोड शोदेखील झाला. याखेरीज कन्याकुमारी, रामनाथपुरम, थिरुनवेल्ली हे मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने ताकद लावली आहे. तिरंगी लढतीत वीस टक्क्यांच्या पुढे भाजपने मते मिळवली, तर दक्षिणेतील या सर्वात मोठ्या राज्यात भाजप चमत्कार करू शकेल अशी चिन्हे आहेत. गेल्या वेळी भाजपला चार तर मित्रपक्ष असलेल्या पीएमकेला पाच टक्के मते मिळाली होती. त्यासाठी गेल्या तुलनेत दुप्पट मते मिळवण्यास त्याचे रूपांतर जागांमध्ये शक्य आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला सर्व ३९ जागांवर मतदान होईल.

हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ कोणत्या प्रकरणांवर सुनावणी करणार?

केरळमध्ये खाते उघडण्याचा विश्वास

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे जाळे आहे. मात्र भाजपला आजपर्यंत तेथे लोकसभेला कधीही यश मिळाले नाही. राज्यात जवळपास ५४ टक्के हिंदू, तर मुस्लीम २६ टक्के आणि ख्रिश्चन १८ टक्के आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडीविरोधात काँग्रेसच्या आधिपत्याखालील संयुक्त लोकशाही आघाडी असाच राज्यात सामना होतो. गेल्या वेळी राज्यातील लोकसभेच्या २० जागांपैकी तिरुअनंतपुरम येथे भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता. उर्वरित ठिकाणी लढतीतही नव्हता. मात्र यंदा भाजपने तिरुअनंतपुरमबरोबरच त्रिचुर, कासरगोड, पलक्कड, अटिंगल तसेच पथ्थनमथिट्टा या जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. तिरुअनंतपुरममधून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हे रिंगणात आहेत. त्रिचुरमध्ये अभिनेते सुरेश गोपी पुन्हा भाग्य अजमावत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात १३ टक्के मते मिळाली. तिरंगी लढतीत भाजपला अजून किमान १५ टक्के मते मिळाल्यासच लोकसभेची जागा जिंकणे शक्य आहे. यंदा भाजपने राज्यातील ख्रिश्चन मतांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यासाठी पक्षाने विविध उपक्रम आयोजित केले होते. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ईशान्येकडील ख्रिश्चन समुदायातील नेत्यांना राज्यात संवाद साधण्यास सांगण्यात आले होते. पक्षाकडून रिंगणात प्रदेशाध्यक्ष, दोन केंद्रीय मंत्री आहेत. तसेच आतापर्यंत भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत एकमेव मुस्लीम उमेदवार हा केरळमधीलच आहे. काँग्रेस नेते ए. के.अँटोनी यांचे पुत्र अनिल हेदेखील रिंगणात आहेत. थोडक्यात समुदायातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देऊन भाजपने केरळमध्ये वातावरण निर्मिती केली. मात्र ती मतांमध्ये कशी परिवर्तित होणार यावर भाजपचे राज्यात खाते उघडण्याबाबत भवितव्य अवलंबून आहे. दक्षिणेतील कर्नाटकमध्ये पूर्वीच्या २५ जागांपैकी यंदा तीन ते चार जागा भाजप गमवेल असे चित्र आहे. मात्र तेलंगणात गेल्या वेळच्या चार जागांमध्ये यंदा वाढ होईल. आंध्रमध्ये गेल्या वेळी भाजपला एक टक्केच मते होती. यंदा तेलुगू देसम तसेच जनसेना यांच्या मदतीने त्याच वाढ होईल. एकूणच २०२४ मध्ये दक्षिणेत ४५ ते ५० जागांचे भाजपचे लक्ष्य आहे. हे संख्याबळ गाठता आले तरच भाजपला त्यांच्या ३७० च्या उद्दिष्टपूर्तीकडे जाता येईल.

hrishikesh.deshpande@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp creating strong atmosphere in tamil nadu and kerala for lok sabha election 2024 zws
First published on: 17-04-2024 at 07:00 IST