राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारणात लक्षणीय बदल झाले. वैचारिकदृष्ट्या ज्यांना टोकाचा विरोध केला, त्यांच्या बरोबरच आता सरकार चालवावे लागत आहे. त्यातच महायुतीमध्ये जागावाटपावरून काही समस्या आहेत. विशेषत: गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात भाजपचे उमेदवार अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. अजित पवार यांचा गट बरोबर आल्याने ज्याचे आमदार त्याच्याकडे ती जागा हे सर्वसाधारण सूत्र महायुतीत मानले जाते. यामुळेच जेथे अजित पवार गटाचे आमदार आहेत तेथे भाजप किंवा शिवसेनेच्या इच्छुकांमध्ये संधी मिळणार नसल्याने चलबिचल सुरू झाली. सध्या अजित पवार गटाचे आमदार असलेल्या २३ जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळेच तेथे गेल्या वेळचे उमेदवार किंवा मोर्चेबांधणी केलेले इच्छुक अन्यत्र संधीच्या शोधात आहेत. यापैकी कागल येथील बडे प्रस्थ व कोल्हापूर जिल्ह्याचे भाजपचे माजी अध्यक्ष समरजित घाटगे यांनी नुकताच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. 

पक्षातूनच कबुली

घाटगे यांच्या पक्षांतराने भाजपला धक्का बसला. मात्र पुढे आणखी काही नेते पक्ष सोडतील अशी अटकळ आहे. पाच ते सहा नेते पक्ष सोडतील हे भाजपच्या प्रदेश नेतृत्वानेच मान्य केले. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. याखेरीज नगर जिल्ह्यातील भाजपचे काही नेते पक्ष सोडण्याची शक्यता आहे. एकेका जागेवर अनेक इच्छुक आहेत. त्यांची पाच वर्षे थांबण्याची अनेक वेळा तयारी नसते. समर्थकांचाही रेटा असतो. अशातच भविष्यातील आडाखे हेरून हे नेते पक्षांतर करतात. गेल्या निवडणुकीपूर्वी भाजपकडे पक्षांतरासाठी रांग होती. यंदा चित्र काहीसे वेगळे आहे. २८८ जागांवर दोन्ही आघाड्यांमध्ये तीन मोठे वाटेकरी आहेत. अशा वेळी इच्छुकांमध्ये धाकधूक आहे. 

हेही वाचा >>>विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?

पक्षांतरामागचे गणित

समरजित घाटगे यांच्या पक्षांतराचा विचार केला तर, घाटगे गट हा कागल तालुक्यातील राजकारणात जुना आहे. त्यांचे वडील विक्रमसिंह घाटगे विरुद्ध सदाशिव मंडलिक असा पूर्वी संघर्ष होता. मंडलिक हे शरद पवार यांचे निष्ठावंत मानले जात. आता मंडलिक यांचे पुत्र शिंदे गटात आहेत. तर कागलमध्ये अजित पवार गटाचे मंत्री असलेले हसन मुश्रीफ हे आमदार आहेत. त्यांनाच महायुतीकडून संधी मिळणार हे पाहून समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. विधानसभेला गेल्या वेळी समरजित हे भाजपकडून लढले. आता यंदा मुश्रीफ महायुतीत असल्याने घाडगे यांना संधी अवघड होती. यातूनच त्यांनी निवडणुकीचे आडाखे बांधून पक्षांतर केले. अनेक ठिकाणी हीच समीकरणे स्थानिक परिस्थितीनुसार मांडली जात आहेत. यातून इच्छुक मात्र अस्वस्थ असून, मतदारसंघाचे स्वरूप पाहून पक्षांतराची समीकरणे मांडली जात आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तर भाजपपुढे काहीसा पेच आहे.  येथे शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभेला त्याचे प्रत्यंतर आले. गेल्या विधासभेला भाजपच्या जवळपास २० जागा या दहा हजारांच्या फरकाने आल्या आहेत. तेथे अशी पक्षांतरे निर्णायक ठरतील.

हेही वाचा >>>युक्रेन युद्धात पुतिन यांना हवी भारताची मध्यस्थी? भारताकडून प्रतिसादाची शक्यता किती?

स्थानिक पातळीवर वितुष्ट

काही ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी किंवा आता अजित पवार गटात कमालीचे वितुष्ट आहे. पुणे शहरातील वडगाव शेरी मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तेथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे काम करणार नाही अशी भूमिकाच जाहीर केली. इतकेच काय पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. या मतदारसंघात भाजपचे जगदीश मुळीक हे दुसऱ्या क्रमांकावर होते. विधान परिषद किंवा सत्तेतील पदांचे आश्वासन किती जणांना देणार? हादेखील भाजपच्या नेतृत्वापुढील प्रश्न आहे. पक्षशिस्तीत पूर्वी जनसंघ असो किंवा नंतर भाजप, उमेदवारी यादी जाहीर झाल्यावर कार्यकर्ते पक्षाच्या आदेशावर उमेदवारांचे काम करायचे. मात्र आता पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारणाला महत्त्व आले. कारखाने किंवा आपल्या संस्था पाहून फायद्या-तोट्याचा विचार केला जातो. अशा वेळी पद हवेच ही टोकाची भावना निर्माण होते. मग निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरे सुरू होतात. मात्र यंदा राज्यात पक्षांतराबाबत भाजप पिछाडीवर राहण्याची चिन्हे विधानसभेतील जागांवरून इच्छुकांची चलबिचल पाहताना दिसते.

hrishikesh.deshpande@expressindia.com