Drug lord Salim Dola: ९० च्या दशकातल्या मुंबईवर ‘डी’ कंपनीचं अर्थात दाऊदचं राज्य होतं. त्याच मुंबईला ‘सेफ सिटी’ करण्याचं काम मुंबई पोलिसांनी केलं. परंतु, आता डी कंपनीचं राज्य एका वेगळ्या अर्थाने संपुष्टात आल्यासारखी स्थिती असली तरी भूतकाळातील या भुताचं सावट आजही मुंबईवर आहे. हे सावट कदाचित मुंबईचं वर्तमान आणि भविष्य खराब करू शकतं. म्हणूनच मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा कंबर कसली… ड्रग्ज कारवाईपासून सुरु झालेल्या साध्या प्रकरणातून त्यांनी थेट या तस्करीतील डॉनच्या हस्तकाला पकडण्यासाठी खुबीने सापळा रचला…
मेफेड्रोन ते डॉन
मेफेड्रोन हे अत्यंत घातक ड्रग्ज अर्थात अमली पदार्थ आहे. मेफेड्रोन हे कृत्रिम उत्तेजक (synthetic stimulant) आहे. या उत्तेजकाचे शरीरावर आणि मनावर गंभीर परिणाम होतात. या ड्रग्जचे व्यसन लवकर लागते. त्यामुळेच एनडीपीएस कायदा (NDPS Act) १९८५ अंतर्गत मेफेड्रोन हा प्रतिबंधित अमली पदार्थ आहे. शिवाय त्याचे उत्पादन, सेवन, विक्री किंवा स्वतःकडे बाळगणे हा दंडनीय अपराध आहे. याच ड्रग्जच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने चार जणांना सांगलीहून अटक केली. आरोपींकडे ४ किलो मेफेड्रोन सापडले.
दिसतं, तसं नव्हतं
परंतु, हे प्रकरण दिसत तेवढं सोपं नव्हतं. एका गुन्ह्याचा शोध घेताना, यामागे मोठं जाळं असल्याचं उघड झालं. या प्रकरणाच्या मुळाशी असलेला मास्टरमाईंड सलीम डोला याच्या मागावर आता मुंबई पोलीस आहेत. सलीम डोलाने सांगलीत मेफेड्रोन तयार करण्याचा कारखाना सुरु केला. त्यानंतर सुरतमध्ये बनावट औषध कंपनी सुरु केली आणि तो थेट यूएईत पोहोचला. मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या साध्या शोध मोहिमेत आंतराष्ट्रीय स्तरावर मादक पदार्थांचा व्यापार करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या सलीम डोलाचे नेटवर्कच सापडले.
मुंबई पोलिसांनी मर्म जाणलं
सलीम डोला सध्या तुर्कीये मध्ये आहे. सलीम डोला हा काही सहसा हाती लागणारा गुन्हेगार नाही, हे ओळखून मुंबई पोलिसांनी त्याचा मुलगा ताहेर आणि पुतण्या मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला यांना पकडण्याचा निर्णय घेतला. जादूगार कितीही तरबेज असला तरी त्याचा जीव पोपटात असतो, हे मर्म जाणून पोलिसांनी सलीम डोलाचा मुलगा आणि पुतण्या यांनाच कह्यात घेण्याचे ठरवले. आता दोघांनाही यूएईमध्ये अटक करून प्रत्यार्पण कायद्यांतर्गत भारतात आणण्यात आले आहे. त्यामुळे ही अत्यंत दुर्मीळ अशी जलद कारवाई मानली जात आहे.
महाराष्ट्र मेफेड्रोनमुळे हैराण
गेल्या काही वर्षांमध्ये मेफेड्रोन या कृत्रिम अमली पदार्थाच्या वापरावर नियंत्रण मिळवणे हे महाराष्ट्रासाठी मोठे आव्हान ठरले आहे. अलीकडेच या विषयाचा उल्लेख राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही झाला. भाजपा आमदार परिणय फुके यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, गेल्या पाच वर्षांत तपास यंत्रणांनी तब्बल ९५२२ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे.
दाऊदशी संबंध
सलीम डोला याचा थेट संबंध हा दाऊद इब्राहिम टोळीशी आहे. इतकंच नाही तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहुराज्यीय ड्रग्ज कार्टेल मेफेड्रोनच्या उत्पादन आणि पुरवठ्यात तो गुंतलेला आहे. हा अमली पदार्थ गोपनीय कारखान्यात तयार केला जातो. त्यातल्याच तीन कारखान्यांवर पोलीसांनी अलीकडेच धाड टाकली होती. डोला हा मेफेड्रोन तयार करण्यासाठी विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पैसा आणि रसायनं पुरवतो. शिवाय कारखान्यांसाठी लागणारी जागाही पुरवतो.
अद्याप तरी डोला हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. परंतु, त्याचा मुलगा आणि पुतण्या यांना ताब्यात घेतल्यामुळे त्याच्या वर्मी घाव बसला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. या दोघांनाही भारतात MLAT आणि इंटरपोल यांच्या नियमांच्या चौकटीत आणले गेले. सध्या डोलाला भारतात आणणे कठीण असले, तरी पोलिसांनी त्यांचे लक्ष त्याचा खंदा सहकारी शकील शेख उर्फ लॅविश याच्याकडे वळवले आहे. डोलाच्या वतीने त्याचे सारे व्यवहार शकील शेख पाहातो आणि तो सध्या यूएईत आहे.
सलीम डोला आणि त्याचे नेटवर्क
अलीम डोला हा मुंबईतील कॉटनग्रीन परिसरातील मूळ रहिवासी होता. गेल्या काही वर्षांपासून त्याचे नाव जगभरातील फरार नामचीन गुंडांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. त्याच्यावर दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोतील ड्रग्ज कार्टेलशी संबंध असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. १९९८ साली मुंबई विमानतळावर सलीम डोला याला ४० किलो मॅन्ड्रॅक्ससह पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. इक्बाल मिर्ची हा पूर्वी डी कंपनीसाठी अंमली पदार्थाचा धंदा करत होता. त्याचीच जागा सलीम डोलाने घेतल्याची शंका मुंबई पोलिसांना आहे.
गुटख्याची तस्करी
१९८० साली डोला हा मुंबईच्या डोंगरी भागात वास्तव्यास आला. डोंगरी हा भाग डी कंपनीचा गड होता. २०१८ साली मुंबई विमानतळावर फेंटानिल हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या प्रकरणातही सलीम डोलाचेच नाव समोर आले होते. मोठ्या प्रमाणात फेंटानिल जप्त करण्यात आले होते. त्या घटनेच्या वर्षभर आधी महसूल गुप्तचर संचालनालयाने गुजरातमधील पिपावव बंदरातून ५.५ कोटी रुपये किमतीच्या गुटख्याची तस्करी केल्याच्या आरोपावरून डोलाला अटक केली होती.
कायदेशीर पळवाटा माहीत असलेला डोला
विशेष म्हणजे त्याला ज्या ज्या वेळेस अटक झाली, त्या प्रत्येक प्रसंगी त्याची जामिनावर सुटका झाली होती. तो चलाख आहे. त्याला एनडीपीएस कायद्यातील पळवाटा चांगल्याप्रकारे माहीत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने इंडियन एक्प्रेसशी बोलताना दिली. काही वर्षांपूर्वी त्याच्या हृदयावर बायपास सर्जरी झाली. त्यानंतर ज्या ज्या वेळी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले, त्या त्या वेळी तो त्याच्या छातीवरचा बायपासचा व्रण दाखवायचा आणि म्हणायचा, ‘मला मारू नका, नाहीतर मी मरून जाईन.’ २०१८ साली त्याने देश सोडला. अलीकडेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने डोलाबद्दल माहिती देणाऱ्यासाठी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
स्वतः मात्र निर्व्यसनी
त्याच्याबद्दल माहिती देताना एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, तो चतुर आहे, स्वतः ड्रग्ज घेत नाही. मद्यपानही करत नाही. त्याचा मुलगा मात्र ड्रग्जच्या आहारी गेला. म्हणूनच डोलाने संपूर्ण कारभार त्याच्याकडे सोपवला नाही. त्याचा विश्वास त्याचा खंदा सहकारी शकील शेख उर्फ लॅविशवर आहे. शकील शेख याला ब्रँडेड गाड्या आणि कपडे यांचा शौक असल्यामुळे त्याला लॅविश हे टोपण नाव मिळाले.
डोलापर्यंत पोहोचवणारा खटला
मुंबई पोलिसांनी सलीम डोला विरुद्धच्या मोहिमेला २०२४ साली सुरुवात केली. त्यावेळी अंमली पदार्थ आणि सांगलीतील इरळी गावाचे कनेक्शन पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी काही दिवस सांगलीमध्ये मुक्काम करून कारखान्यावर छापा टाकला होता. या छाप्यात १२२ किलो मेफेड्रोन आणि कच्चा माल आणि रसायनं जप्त केली. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली.
बनावट औषध कंपनीमार्फत व्यवहार
चौकशी दरम्यान त्याचा पुतण्या युएई ते सुरत दरम्यान वारंवार प्रवास करत होता हे समोर आले. मेफेड्रोन तयार करण्यासाठी लागणारी रसायनं तो कारखान्यांना पुरवत होता. यातूनच पोलिसांना पुढच्या गोष्टींचा उलगडा झाला. कुब्बावाला आणि ताहेर हे दोघ यूएईमधून संपूर्ण कारभार चालवतात हे समजण्यास मदत झाली. ताहेर आणि कुब्बावालाला यूएईतून डिपोर्ट करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने, सीबीआयमार्फत, यूएई अधिकाऱ्यांना त्यांना लागणारी सर्व माहिती पाठवली, यात आरोपपत्राच्या मराठी आणि अरबीमधल्या दोन्ही प्रती होत्या. कुब्बावालाने दिलेल्या माहितीमुळे सुरतमधील ब्रिजेश मोराबिया यालाही पकडण्यास मदत झाली. ब्रिजेश मोराबिया मेफेड्रोन तयार करणाऱ्या कंपन्यांना ब्रोमाईड पुरवत होता. शिवाय सुरतमध्ये बनावट औषधांची कंपनी चालवत होता. आता या प्रकरणात एकूण १४ जणांना अटक करण्यात आली आहे.