-दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवरात्र उत्सवात करवीर नगरीत चैतन्याचा प्रवाह वाहतो. त्याला कारणे दोन. साडेतीन खंडपीठांपैकी एक शक्ती देवता असलेल्या महालक्ष्मीचा शारदीय नवरात्र उत्सव. दुसरे कारण अर्थातच कोल्हापूरचा शाही दसरा. एक प्राचीन परंपरा तर दुसरी ऐतिहासिक. ऐतिहासिक पाऊलखुणांवरून वाटचाल करणारा शाही दसरा आता पूर्वीइतका भव्य होत नसला तरी त्याचे महत्त्व, तेज अद्यापही कायम आहे. आता तर राज्य शासनाने २५ लाख रुपयांची मदत करीत तो ‘ग्रँड इव्हेंट’करण्याचे जाहीर केले आहे. शाही दसऱ्यावर शासनमान्यतेची मोहोर उमटली आहे.

कोल्हापूरचे धार्मिक महत्त्व कोणते?

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने ते प्रसिद्ध आहे. महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. प्राचीन काळापासून हे विविध राजघराण्यांचे राजधानीचे ठिकाण होते. अश्विन महिना सुरू झाला की कोल्हापुरात चैतन्य पर्व सुरू होते. घटस्थापनेपासून महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातील भाविक येत असतात. दख्खनचा राजा जोतिबाचा नवरात्र उत्सवही तितकाच महत्त्वपूर्ण असतो.

शाही दसऱ्याची परंपरा कधीपासून?

छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड जिंकल्यानंतर पुनश्चः कोल्हापूर परिसर स्वराज्यात समाविष्ट झाला. महाराणी ताराबाईंच्या काळात कोल्हापूर शहरास राजधानीचे स्वरूप प्राप्त झाले. पूर्वीच्या काळी विजयादशमीला शस्त्रपूजा करून युद्धभूमीवर पाऊल टाकले जात असे. मराठेशाहीच्या काळात कोल्हापुरातील दसरा अधिक प्रभावीपणे साजरा केला जाऊ लागला.

शाही दसरा कसा साजरा केला जात असे?

मराठेशाहीच्या काळात दसऱ्याचा थाट भव्य-दिव्य होता. त्याचे वर्णन आजही मोठ्या कौतुकाने केले जाते. करवीर संस्थानात आठवडाभर आधी तयारी सुरू असे. विजयादशमीदिनी दिवस मावळतीला झुकू लागल्यावर भवानी मंडपातून शाही मिरवणूक सुरू होत असे. बंदुकीतून बार उडवला की मिरवणूक पुढे सरकत असे. सजवलेला हत्ती, अश्वदल, उंट, लष्करी वाद्यमेळा, पायदळ असा क्रम असे. पारंपारिक वाद्य आणि इंग्रजी चालीचा बँड याचा सुरेख मेळ लोकांना खिळवून ठेवत असे. अंबाबाई ,भवानी, देवी गुरु महाराज अशा तीन पालख्या निघत. पालखीमागे छत्रपती महाराज, मानकरी, सरदार, इनामदार, जागीरदार, प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, मल्ल असत. ऐतिहासिक दसरा चौकात मिरवणूक पोहोचे. सुशोभित शामियान्यात छत्रपती परिवार विराजमान होत असे. पुरोहित मंत्रोच्चार करीत शमीपूजन करीत. महाराजांना विडे दिल्यानंतर श्रीमंत महाराज शमीपूजन करीत. सूर्य मावळला की मग सोने लुटण्यासाठी झुंबड उडत असे.

शाही दसऱ्याचे आजचे स्वरूप कसे आहे?

संस्थाने विलीन झाली असली तरी आजही शाही दसऱ्याची परंपरा छत्रपती घराणे आणि ‘छत्रपती देवस्थान ट्रस्ट’कडून जपली जाते. शाही सीमोल्लंघन सोहळ्याचे महत्त्व कायम आहे. भव्य मिरवणुका अलीकडे निघत नाही. तथापि, शाही दसरा आणि त्याची करवीरकरांची आंतरिक जोडलेली नाळ आजही कायम आहे. याचे दर्शन दसरा चौकात जमलेली गर्दी दर्शवते. कालानुरूप बदलही दिसतो. ४० कोटींच्या मेबॅक मोटारीमधून शाही परिवाराचे आगमन होते. तेव्हा मोठ्या प्रेमाने त्यांचे स्वागत केले जाते. उत्सवात कधीतरी व्यत्यय येतो. मागील दोन वर्षे शाही दसरा साजरा करण्यात मर्यादा आल्या. करोनाचे निर्बंध हे त्याचे निमित्त होते.

राज्य शासनाची भूमिका कोणती दिसते?

यावर्षी पुन्हा दसरा थाटात साजरा करण्याची तयारी होती. यंदा राज्य शासनही २५ लाख रुपयांची मदत करणार आहे. दसरा हा भव्य सोहळा म्हणून साजरा करण्याचा मनोदय पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शाही दसरा पोहोचवण्याचा संकल्प आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या माध्यमातून कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याची सोनेरी संबंध राखण्याचा प्रयत्न चालवण्याची चर्चा आहे. राजकीय भाग अलाहिदा; पण कोल्हापूरचा दसरा सातासमुद्रापार जातो आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur sahi dasara celebration history and importance print exp scsg
First published on: 05-10-2022 at 09:51 IST