इटालियन लग्झुरी फॅशन ब्रँड ‘प्रादा’ने कोल्हापुरी चप्पलसारखे पादत्राण यंदाच्या फॅशन महोत्सवात वापरले आणि त्यावरून एकच गहजब उडाला. भारतीय कलाकुसरीवर आक्रमण झाल्याची टीका होऊ लागली. त्यावर प्रादाकडून नरमाईची भूमिका घेतली गेली. परंतु, कोल्हापूर चप्पल पुन्हा एकदा चर्चेत आली. हे एका दृष्टीने कोल्हापुरी चप्पलसाठी फायदेशीर ठरले. कोल्हापुरी हस्तकलेचा एक अद्वितीय नमुना म्हणून या वहाणेकडे पाहिले जाते. आकर्षक, टिकाऊ आणि आरोग्यदायी असणारी कोल्हापुरी चप्पल जगभरात देश-विदेशात विकली जाते. स्थानिक भाषेत या पादत्राणांना पायतान म्हणून संबोधले जाते.

कोल्हापुरी चपलेचे वेगळेपण कोणते?

कोल्हापुरी चप्पल बनवण्याची विशिष्ट प्रक्रिया आहे. हिरडा, बाभूळ साल, चुना अशा घटकांचे मिश्रण करून ते जनावरांच्या कातड्यामध्ये घालून टांगून ठेवले जाते. त्यास दिवसाआड पाणी घातले जाते. दीड महिन्यानंतर हे कातडे चप्पल बनवण्यासाठी वापरले जाते. चप्पल बनवण्यासाठी वापरले गेलेले हे सर्व घटक आयुर्वेदिक असल्याने चपलांमध्ये त्याचे गुण उतरतात, असे चर्मकारांचे म्हणणे आहे. म्हणून चप्पल बनवण्यासाठी सहा आठवडे लागू शकतात. कातड्यापासून आणि धाग्यापासून बनवलेले, तळाच्या जाडीमुळे ते वजनदार असते. राज्यात अति उष्णतेमुळे आणि डोंगराळ प्रदेशातही ते टिकाऊ ठरते. कोल्हापुरी चप्पल चांगल्या प्रकारे देखभाल केल्यास आणि पावसाळ्यात न वापरल्यास गेल्यास दीर्घकाळ टिकतात.

कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध कशी झाली?

कोल्हापुरी चपलेची उत्पत्ती १२व्या शतकात झाल्याची इतिहासात नोंद आहे. परंतु तिचा वापर तेराव्या शतकानंतर होऊ लागला. १९व्या शतकात अमेरिकेत हिप्पी या वर्गाने ही चप्पल वापरायला सुरुवात केल्यानंतर त्यांचा जगभर प्रचार, प्रसार होत गेला. मुंबईत काही खास दुकानांमध्ये ती विक्रीला ठेवल्यानंतर तिची लोकप्रियता देशातील इतर महानगरांमध्ये आणि शहरांमध्येही वाढत गेली. अशा प्रकारे कोल्हापूर चपलेचा लौकिक सर्वदूर होत राहिला. कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापुरी पायताण, कापशी, पायताण, कचकडी, बक्कलनाली, पुकरी अशा अनेक नावांनी ओळखली जाते, असे कोल्हापुरी चप्पल क्लस्टरचे अध्यक्ष अशोक गायकवाड सांगतात. कोल्हापुरात चप्पल विक्री वार्षिक सुमारे २०० कोटींची आहे. चार हजार चर्मोद्योग कारागीर यात असून शहरात चप्पल विक्रेते २०० आहेत.

नवा वाद कोणता?

यंदाच्या वसंत-उन्हाळी पुरुषांच्या फॅशन जगतात इटालियन लग्झुरी फॅशन ब्रँड प्रादाकडून कोल्हापुरी चप्पलसारखे दिसणारे सँडल सादर करण्यात आले. ते कोल्हापुरी असतानाही त्याचा नामोल्लेख न केल्याने भारतीय फॅशन वर्तुळात आणि महाराष्ट्रातील पारंपरिक कारागिरांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यांनी कोल्हापुरी चपलेचा समावेश भौगोलिक उपदर्शमध्ये (जीआय) असल्याचे पुरावेच मांडायला सुरुवात केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरने रीतसर तक्रार केली. त्यानंतर प्रादा ग्रुपचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे प्रमुख लोरेन्झो बर्टेली यांनी संबंधित सँडलची भारतीय प्रेरणा असल्याचे नमूद केले.

सांस्कृतिक मान्यता आणि स्थानिक कारागिरांशी सहकार्य करण्याची वचनबद्धता पत्राद्वारे व्यक्त केली. पण हे करताना त्यांनी कोठेही ‘कोल्हापुरी चप्पल’ असा उल्लेख मात्र केलेला नाही. यानंतर चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ‘कोल्हापुरी चपलांना भारत सरकारने जीआय मानांकन दिले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ते पुरेसे नाही. आपल्याला या चप्पल उत्पादनांचे पेटंट घेण्याची आवश्यकता आहे. कोल्हापुरी चप्पलच नाही तर कोल्हापूरच्या गुळाचेही पेटंट घेऊ,’ असे म्हटले आहे. तर माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही कोल्हापुरी चपलेबाबत केवळ भावनिक न होता त्याचे पेटंट मिळवणे अत्यावश्यक असल्याचे कोल्हापुरात नमूद केले.

कोल्हापुरी चप्पल पेटंटचा वाद काय?

सहा वर्षांपूर्वी कोल्हापुरी चपलांना पेटंट मिळाले आले तरी त्याचा वाद पूर्णपणे संपलेला नाही. मुळात कोल्हापुरी चपलेवर प्रथम दावा केला गेला तो चेन्नई येथून. पेटंट दिल्या जाणाऱ्या विभागात एक कर्नाटकच्या वरिष्ठ अधिकारी होत्या. त्यांच्या प्रयत्नाने कर्नाटकातील काही जिल्ह्यांतून यासाठी दावा केला गेला. पुढे या स्पर्धेत महाराष्ट्र उतरले. २०१९ साली कोल्हापूर, सांगली, सातारा , सोलापूर हे जिल्हे तसेच कर्नाटकातील पाच जिल्ह्यांना मिळून कोल्हापूर चपलेचे पेटंट मिळाले. परंतु, कोल्हापुरी चप्पल बनवण्याची प्रक्रिया केवळ कोल्हापुरातच होत असल्याने याच भागासाठी पेटंट मिळाले पाहिजे, असा दावा कोल्हापुरातील चप्पल कारागिरांकडून केला जात आहे. कोल्हापुरी चपलेला भौगोलिक मानांकनाच्या आधारे सन्मान, नुकसानभरपाई मिळावी यासाठी पेटंटसाठी सुरुवातीला प्रयत्न करणारे डॉ. गणेश हिंगमिरे यांचे प्रयत्न सुरू आहेत.

आव्हाने कोणती?

अलिकडच्या काळामध्ये कोल्हापुरी चप्पल वेगळ्या पद्धतीने विकण्याचे प्रयत्न काही तरुणांनी केलेले आहेत. राहुल कांबळे या तरुणाने बनवलेल्या चप्पलला विदेशातूनही मागणी होत आहे. यातील काही चपला २५ हजार रुपये किमतीलाही विकल्या जात आहे. असेच प्रयोग आणखी काही तरुण तसेच अन्य उद्योजकांनी केले आहेत. त्यांच्या उत्पादनांचीही चांगली विक्री होत आहे. तथापि कोल्हापुरी चप्पल निर्मात्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. बनावट, निकृष्ट दर्जाच्या चप्पलनिर्मितीमुळे अनेक ग्राहक नाराज आहेत. परिणामी कोल्हापुरी चपलेची प्रतिष्ठा कमी होत चालली आहे. लौकिक मिळवून देण्यासाठी गुणवत्ता टिकवणे हे खरे आव्हान आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय फॅशन महोत्सवात कोल्हापुरी चप्पल चमकत असताना मूळ ठिकाणी मात्र तिच्या अस्तित्वाला ग्रहण लागले आहे.

शासकीय पातळीवरून कोल्हापुरी चपलेचा विकास करण्यासाठी वारंवार नानाविध घोषणा होत असल्या तरी त्याची यथार्थपणे अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. कोल्हापुरी चप्पल क्लस्टर रखडले आहे. करोनानंतर कोल्हापुरी चपलांना मागणी वाढली असली तरी चप्पल कारागीर, व्यवसायिक यांच्यापुढे आर्थिक चणचण निर्माण झाली असल्याने मागणीइतका पुरवठा करण्यात ते असमर्थ ठरले आहेत. कोल्हापुरी चपला देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी आणि या व्यवसायाला बळकटी आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न स्वागतार्ह असले तरी प्रत्यक्षात व्यावसायिक,कारागिरांच्या पातळीवरील अडचणी सुटल्या जात नसल्याने त्यांच्यासमोर गुंता निर्माण झाला आहे.