हृषिकेश देशपांडे
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पहिले दोन टप्पे झाल्यावर राज्यात महायुतीमधील जागावाटप स्पष्ट झाले. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ८० जागांनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यामुळे दिल्लीतील सत्तेसाठी या जागा दोन्ही आघाड्यांना महत्त्वाच्या आहेत. अकोला, अमरावती व छत्रपती संभाजीनगर तसेच सांगलीचा अपवाद सोडला तर उर्वरित ४४ मतदारसंघांत सरळ सामना आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर तर अमरावतीत प्रहार संघटना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमने आव्हान उभे केले. इतरत्र भारतीय जनता पक्ष-शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व इतर मित्र यांची राष्ट्रीय लोकशाही यांच्या विरोधात काँग्रेस-उद्धव ठाकरे गट तसेच शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास किंवा इंडिया आघाडी असा अटीतटीचा सामना राज्यात आहे. 

२०१९मध्ये…

गेल्या वेळी भाजप-सेना युतीविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी अशी लढत होती. शिवसेना, राष्ट्रवादीमधील फुटीनंतर चित्र बदलले. गेल्या म्हणजेच २०१९ मध्ये चाळीसच्या वर जागा पटकावणाऱ्या महायुतीपुढे यंदा महाविकास आघाडीने विविध पक्षांची मोट बांधली आहे. त्यामुळे महायुतीचे नेतेही सावध आहेत. विविध राजकीय पक्षांमधील फुटीनंतर हा पहिलाच कौल आहे. यंदा प्रचारात कोणताही खास असा मुद्दा नाही. राज्यही त्याला अपवाद नाही.  शिवसेना, राष्ट्रवादीमधील फूटीचा मुद्दा प्रचारात आहे. 

हेही वाचा >>> कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर जीव गमावलेल्या मुलींचे पालक दाखल करणार गुन्हा, नेमके प्रकरण काय?

मुंबई, कोकण पट्ट्यासाठी लढाई

मुंबई महानगरात ६ तर ठाणे जिल्हा ३ व पालघर तसेच रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग प्रत्येकी १ अशा १२ जागा म्हणजे राज्यातील एकूण जागांच्या २५ टक्के जागा येथून येतात. मुंबईत प्रामुख्याने महायुतीविरोधात ठाकरे गट यांच्यात चुरस आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजप-सेनेने सर्व सहा जागा जिंकल्यात. मात्र आता फुटीनंतर ठाकरे गट महाविकास आघाडीत आहे. मुंबईतील मराठी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभूती दिसते. त्यामुळे या लढती चुरशीच्या होतील. महाविकास आघाडीचे सर्व सहाही उमेदवार मराठी आहेत. महायुतीत भाजप-शिंदे गट प्रत्येकी तीन जागा लढत आहे. भाजपचीही शहरात मोठी मतपेढी आहे. पक्षापेक्षा पंतप्रधानांना मानणारा मतदार असून, यामुळे निकालाची उत्सुकता आहे. ठाणे जिल्हा मुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा. तेथे त्यांना यश मिळवून दाखवावे लागेल. तळकोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वर्चस्व राहणार की ठाकरे गट दबदबा कायम ठेवतो, याचा फैसला यानिमित्ताने लागेल.

हेही वाचा >>> कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर जीव गमावलेल्या मुलींचे पालक दाखल करणार गुन्हा, नेमके प्रकरण काय?

साखर पट्ट्यात चुरस

सहकारी बँका, साखर कारखाने, शिक्षण संस्थांचे जाळे यामुळे पश्चिम महाराष्ट्रील ऊस कारखानदारीचा साखरपट्टा तसेच सहकाराचे प्रभाव असलेला हा भाग. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नगर या जिल्ह्यांतही १२ जागा येतात. त्यात पुण्यात सर्वाधिक ४ मतदारसंघ असून नगर, कोल्हापूर, सोलापूरमध्ये प्रत्येकी २ तर सातारा व सांगली जिल्ह्यात प्रत्येकी १ मतदारसंघ आहे. सुरुवातीला काँग्रेसनंतर राष्ट्रवादीचे प्रभावक्षेत्र असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात व्यक्तिकेंद्रित राजकारण अधिक चालते.  साखर कारखानदारांना पक्षात प्रवेश देऊन भाजपने येथे शिरकाव केला. यंदा महायुतीविरोधात महाविकास आघाडी यांच्यात येथे चुरस आहे. शहरी भागातील २ जागा सोडल्या तर उर्वरित १० जागांचे भाकीत वर्तवणे कठीण आहे इतका संघर्ष या पट्ट्यात आहे. नातीगोती तसेच कौटुंबिक संबंध यांनाही निवडणुकीत महत्त्व असते. यंदा साखर पट्टा कोणाच्या बाजूने वळेल हे सांगणे कठीण झाले आहे.

विदर्भात राष्ट्रीय पक्ष प्रभावी

विदर्भातील १० जागांवर पहिल्या २ टप्प्यांत मतदान झाले. गेल्या वेळी इतकेच मतदान यंदाही झाले. एका जागेचा अपवाद वगळता उर्वरित जागा भाजप-सेनेकडे होत्या. मात्र यंदा काँग्रेसने तगडे उमेदवार देत भाजपला टक्कर दिली. विदर्भात प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमध्येच सामना आहे. गेल्या वेळीप्रमाणे यंदा एकतर्फी निकाल नाहीत हे मात्र नक्की.

मराठवाड्यात आरक्षणाचा मुद्दा

मराठवाड्यात ८ जागा आहेत. गेल्या वेळी छत्रपती संभाजीनगरची जागा एमआयएमने जिंकली होती. यंदाही तेथे तिरंगी लढत आहे. मराठा आरक्षण, पाण्याची समस्या हे मुद्दे या वेळी मराठवाड्यात चर्चेत आहेत. अनेक ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागत आहे. १९९० नंतर मराठवाड्यात शिवसनेने जम बसवला. आताही ठाकरे गटाला मराठवाड्यातून मोठ्या अपेक्षा आहेत. येथील काही जागांवर दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले.

हेही वाचा >>> पाकिस्तानात घुसून अमेरिकी नौदलाने ओसामा बिन लादेनला कसं केलं ठार; ऑपरेशन ‘नेपच्यून स्पीयर’ काय होते?

उत्तर महाराष्ट्रात भाजपचा संघर्ष

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार येथे ६ जागा आहेत. यात नाशिक तसेच जळगावमध्ये प्रत्येकी २ तर धुळे व नंदुरबारमध्ये १ जागा आहे. भाजपचा येथे गेल्या तीन निवडणुकींत प्रभाव दिसला. विशेषत: जळगाव जिल्ह्यात भाजपने मुसंडी मारली आहे. नाशिकची प्रतिष्ठेची जागा शिंदे गटाकडे आहे. धुळे, नंदुरबार या काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघात भाजपने यश मिळवले आहे. मात्र यंदा या जागा टिकवण्यासाठी भाजपला संघर्ष करावा लागत आहे. काही अंतर्गत कलहांमुळे भाजपची कोंडी झाली.

११ जागांचे यंदा काय होणार?

गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एक लाखाहून कमी मताधिक्य असलेल्या ११ जागा आहेत. यात छत्रपती संभाजीनगर येथे सर्वात कमी म्हणजे ४ हजार ४९२ मतांनी एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. तर हातकणंगलेमध्ये शिवसेनेचे धैर्यशील माने हे ९६ हजार मतांनी जिंकले. ही आकडेवारी पाहता यंदाच्या थेट लढतीत मतदान किती होते, कार्यकर्ते आपले पारंपरिक मतदार कितपत बाहेर काढणार यावर या जागा ठरतील. त्यातही छत्रपती संभाजीनगरसह, रायगड, अमरावती, नांदेड, परभणी व चंद्रपूर येथील विजयी उमेदवारांचे मताधिक्य हे पन्नास हजारांपेक्षाही कमी आहे. यामुळे ज्याची पक्षसंघटना उत्तम काम करेल त्यांना या चुरशीच्या लढतीत यश मिळेल. महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभेला दोन तगड्या आघाड्यांमधील हा सामना रंगतदार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर याचे परिणाम होतील. कारण जागावाटपासाठी हा निकाल दोन्ही आघाड्यांना दिशादर्शक ठरेल. 

hrishikesh.deshpande@expressindia.com