– जयेश सामंत

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंत्रालयात बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे. कोंडीच्या विळख्यात सापडलेले रस्ते, अपुरा पाणी पुरवठा, संथगतीने सुरू असलेले प्रकल्प, कचराभूमीचा झालेला विचका यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांना समस्यांनी घेरले आहे. हाती घेतलेल्या प्रकल्पांना अजूनही म्हणावा त्या प्रमाणात वेग आलेला दिसत नाही. ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद मिळाले असल्याने हे प्रकल्प वेगाने मार्गी लागतील आणि येणाऱ्या काळात रोजचा प्रवास किमान सुसह्य होईल अशी येथील नागरिकांना अपेक्षा आहे.

कळवा उड्डाणपूल ॲाक्टोबरमध्ये खुला होणार?

तिजोरीत खडखडाट आणि हजारो कोटी रुपयांचे दायित्व यामुळे ठाण्याचे महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी मागील वर्षी अर्थसंकल्पात गगनभेदी प्रकल्पांचा मोह आवरता घेतला. तसेच रेंगाळलेले प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यावर भर दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. अर्थसंकल्प मांडत असताना ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या कळवा खाडीवर उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या उड्डाणपूलाचे काम सप्टेंबर महिन्याअखेरीस पूर्ण करण्याची नवी मुदत आखून देण्यात आली आहे. ठेकेदाराला निधीची चणचण भासू नये यासाठी टप्प्याटप्प्याने निधी वाटपाचे नियोजनही करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या पुलाचे काम वेगाने पूर्ण होत आहे. येत्या महिनाभरात या उड्डाणपूलाची एक मार्गिका सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

कोपरी पुलाचे रडगाणे कधी संपणार?

पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पूल हा अत्यंत अरुंद असा आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून कोपरी रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचा निर्णय घेतला. २०१६मध्ये या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली. २५८ कोटी ७६ लाख रुपयांच्या या प्रकल्पाची किंमत पुढे वाढत गेली. तसेच २०१६मध्ये मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास २०१८मध्ये सुरुवात झाली.

सुरुवातीला दीड ते दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल असा दावा संबंधित यंत्रणांकडून केला जात होता. प्रत्यक्षात २०२२ उजाडले तरी या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. सद्यःस्थितीत या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील काम म्हणजेच मुख्य पुलाच्या बाजूला दोन मार्गिका उभारल्या जात आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील काम म्हणजेच मुख्य मार्गाच्या निर्मितीचे कामही सुरू आहे. येत्या चार महिन्यांत ही मार्गिका पूर्ण केली जाईल असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

माणकोली उड्डाणपुलाचे काय झाले?

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांना सामोरे जात असताना सात वर्षापूर्वी शिवसेना-भाजप या सत्तेत असलेल्या पक्षांनी येथील नागरिकांपुढे वेगवेगळ्या विकास प्रकल्पांची जंत्रीच सादर केली होती. डोंबिवली-मुंबई, ठाणे रस्ते मार्गाने जोडणारा मोठागाव खाडीवरील माणकोली उड्डाणपूल हा याच आश्वासनांपैकी एक. या उड्डाणपुलाचे काम २०१६ पासून सुरु आहे. या पुलामुळे ठाणे-डोंबिवली प्रवासाचे अंतर अर्ध्या तासावर येईल असे दावे केले जात आहेत. प्रवाशांना भिवंडी बाह्यवळण, कल्याण शीळ मार्गाच्या प्रवासाचे हेलपाटे यामुळे मारावे लागणार नाहीत असा दावा केला जात आहे. हे काम तीन वर्षांत पूर्ण केले जाईल असे दावे सुरुवातीच्या काळात केले जात होते.

हेही वाचा : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, दीपक केसरकर म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…”

प्रत्यक्षात सहा वर्ष उलटले तरीही हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. पोहोच रस्त्यासाठी आवश्यक जमिनीचे संपादन, प्रत्यक्ष पुलाच्या उभारणीला बसलेला संथगती कारभाराचा फटका यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नेमका कधी सुरू होईल हे खात्रीशीर पद्धतीने कुणालाही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. कल्याण-शीळ या महत्त्वाच्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असले तरी डोंबिवली २७ गाव भागातील शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न अंधातरी असल्यामुळे या भागात हा रस्ता सहाऐवजी पाच मार्गिकांचा करण्याचा विचार आता सुरू झाला आहे. या तांत्रिक गुंत्यामुळे मूळ कामाची रखडपट्टी सुरूच असल्याने येथून प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत.