किशोर कोकणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा मुंब्रा बाह्यवळण (बायपास) मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी एक एप्रिलपासून पुन्हा एकदा बंद केला जाणार आहे. साधारणपणे दोन महिने हे दुरुस्तीचे काम सुरू राहील असा दावा संबंधित यंत्रणांनी केला आहे. पूर्वानुभव लक्षात घेता ही मुदत कितपत पाळली जाईल, याविषयी मात्र शंका आहे. उरणस्थित जवाहरलाल नेहरू बंदरापासून भिवंडीतील गोदामांपर्यंत दररोज हजारो टन माल वाहतुकीचा एक नवा मार्ग गेल्या दशकभरात तयार झाला आहे. भिवंडी आणि आसपासच्या खाजण, मोकळ्या, आरक्षित जमिनींवर अतिक्रमण करत शेकडोंच्या संख्येने याठिकाणी गोदामांच्या रांगा उभ्या राहिल्या. या गोदामांमध्ये देशभरातील मोठ्या उद्योगांची मालाची साठवण केली जाते. सुरुवातीला ‘बेकायदा’ असलेला हा उद्योग गेल्या काही वर्षांत अधिकृत ठरू लागला आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरण याठिकाणी लॅाजिस्टिक पार्कसाठी पद्धतशीर आखणी करत आहेत. आवश्यक आरक्षणे टाकली जात आहे. मात्र हा सगळा उद्योग वरातीमागचे घोडे दामटण्यासारखा सुरू आहे. दररोज होणारी लाखो टन मालाची वाहतूक, अजस्र अशी अवजड वाहनांची ये-जा करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, रस्ते, मार्गिका यांची मात्र वानवा राहिली आहे. मुंब्रा बाह्यवळण रस्त्यांवरून ही वाहने दररोज धावत असतात. वाहनांचा हा भार पेलता पेलता हा बाह्यवळण रस्ता खचू लागला आहे. त्यामुळे वरचेवर या मार्गाची दुरुस्ती करावी लागते आणि त्याचा भार मात्र संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांना सोसावा लागतो अशी परिस्थिती आहे.

मुंब्रा बाह्यवळण मार्ग केव्हा आणि कोणत्या कंपनीने तयार केला?

राज्य सरकारने सन २००० मध्ये मुंब्रा शहरातील कोंडी सोडविण्यासाठी या बाह्यवळण रस्त्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. ठाणे-कळवा-डोंबिवली-शीळफाटा हा प्रवास मुंब्र्यातील अंतर्गत रस्त्यांवरून टाळला जावा यासाठी या रस्त्याची निर्मिती इतकेच उद्देश या आखणीमागे ठेवण्यात आला होता. अटलांटा लिमिटेड या कंपनीला रस्त्याच्या उभारणीचे काम देण्यात आले. ५.४१ किमी लांबीचा हा मार्ग होता. २००५ मध्ये या मार्गिकेची लांबी आणखी वाढविण्यात आली. त्यामध्ये रेल्वे उड्डाणपुलाच्या भागाचाही सामावेश होता. २८ डिसेंबर २००७ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. त्यानंतर २००८ मध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता.

विश्लेषण : आता दुर्मीळ आजारावरील औषधे स्वस्त, सीमा शुल्क रद्द करण्याचा निर्णय; जाणून घ्या

बाह्यवळण मार्गाचा दर्जा सुरुवातीपासूनच खराब होता?

अटलांटा कंपनीने हा रस्ता बांधल्याने या कंपनीकडून पथकर आकारला जात होता. पंरतु या रस्त्याच्या कामाविषयी सुरुवातीपासूनच अनेकांकडून शंका उपस्थित केल्या जात होत्या. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना ठाण्यातील एका नेत्याकडे विधान परिषदेतील ताकदवान पद होते. या पदाच्या जोरावर ठाणे आणि आसपासच्या शहरातील राजकीय आणि कंत्राटी वर्तुळात हा नेता ‘डाव’ टाकून होता, अशी चर्चा आहे. मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या कामातील ठेकेदाराला या नेत्याचा लाभलेल्या वरदहस्ताच्या कहाण्या नेहमीच चर्चेत असत. त्यामुळे या मार्गाच्या दर्जाविषयी शंका उपस्थित होत असतानाही शासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत होत्या. २०१३मध्येही या मार्गावर सिमेंट काँक्रिट रस्त्याला तडा गेला होता. तसेच रस्त्याला मोठे वळण असल्याने मागील सात ते आठ वर्षांत या मार्गावर ९० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात जीवघेणे खड्डे का पडतात?

पथकर बंद झाल्याने रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या रेतीबंदर भागात खड्डे पडत असतात. रेतीबंदर येथील पुलाचा भाग हा अवजड वाहने वाहतूक करतील इतक्या चांगल्या दर्जाचा नसल्याचे वाहतूक पोलीस सांगतात. मागील दोन वर्षांत या पुलावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. मागील वर्षी पुलामधील सळया बाहेर आल्या होत्या. तर काही खड्ड्यांमधून पुलाखालील रस्ताही दिसत होता. या खड्ड्यांमुळे अवजड वाहनांचे नुकसान होऊन वाहने रस्त्यात बंद पडत होती. एखादे वाहन या पुलावर बंद पडल्यास त्याचा फटका संपूर्ण ठाणे शहरात बसत होता.

चित्त्याबाबतही राजकारण?

दुरुस्तीसाठी केलेला कोट्यवधींचा खर्च वाया गेला आहे का?

२०१८ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने साडेचार कोटी रुपये खर्च केले होते. त्यामध्ये पुलावर बांधकाम करणे, मजबुतीकरण करणे अशी कामे करण्यात आली होती. दोन महिने या कामासाठी लागणार असल्याचा दावा त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला जात होता. प्रत्यक्षात त्यासाठी चार महिने लागले. या काळात ठाणे, नवी मुंबई ही शहरे दररोज होणाऱ्या वाहनकोंडीमुळे त्रस्त झाली होती. इतके करूनही जुलै २०२२मध्ये या रस्त्याला पुन्हा मोठे भगदाड पडले होते. त्यानंतर पुन्हा महिनाभर काम सुरू होते. यापुर्वी २०२१ मध्येही खड्डे बुजविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे.

हा मार्ग नेमका का बंद होत आहे?

पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या काही भागाचे काम केले होते. परंतु काही भाग शिल्लक राहिला होता. त्याचे काम आता केले जाणार आहे. तसेच रेल्वे पुलाच्या भागाचे कामही केले जाणार आहे. या रस्त्याचा काही भाग डांबरी असून या ठिकाणी आता काँक्रीटचे मजबूत थर तयार केले जाणार आहे. या कामास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले जात आहे. दोन वर्षांपूर्वीच हे काम केले जाणार होते. परंतु वाहतूक कोंडीच्या शक्यतेमुळे पोलिसांकडून मंजुरी मिळत नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर या कामास अखेर सुरुवात होणार आहे.

उन्नत मार्गाचा पर्याय कागदावरच?

मुंब्रा बाह्यवळण मार्गावर पथकर भरावा लागत नसल्यामुळे अनेक अवजड वाहने याच मार्गावरून वाहतूक करतात. तसेच नवी मुंबई येथे मोठ्या कंपन्यांची कार्यालये असल्याने हलकी खासगी वाहनेही याच मार्गावरून ये-जा करतात. रेतीबंदर ते वाय जंक्शनपर्यंत मार्गाचा सार्वजनिक बांधकाम विभागाने अभ्यास करून त्याआधारे येथे उन्नत मार्ग उभारणीचा प्रस्ताव २०१७मध्ये राज्य शासनाकडे पाठविला होता. तसेच उन्नत मार्ग उभारणीसाठी या मार्गावरील वाहतुकीचे सर्वेक्षण करणे गरजेचे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१८मध्ये तसे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये या मार्गावरून दिवसाला ३६ हजार वाहने वाहतूक करीत असून त्यात २० ते २५ हजार अवजड वाहनांचा समावेश असल्याचे समोर आले होते. मात्र, २०१७मध्ये पाठविलेल्या या प्रस्तावावर राज्य शासनाने कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे उन्नत मार्ग उभारणीचा प्रस्ताव केवळ कागदावर असल्याचे चित्र आहे

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbra bypass road bad condition closed for repairing print exp pmw