जयेश सामंत, निलेश पानमंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे आणि भिवंडी या दोन शहरांच्या मधोमध एका नव्या ठाण्याची निर्मितीचे स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासून रंगविले जात आहे. आर. ए. राजीव यांच्याकडे ठाणे महापालिकेची धुरा असताना त्यांनी या नव्या शहराच्या निर्मितीचा एक ढोबळ आराखडा तयार केला होता. यासाठी परदेशस्थित काही मोठ्या कंपन्यांची मदतही घेण्यात आली होती. मधल्या कालखंडात यासाठी आवश्यक जमिनीचे सर्वेक्षण, त्याठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने विकासाची कल्पना, प्रकल्पांचे सूतोवाचही वेळोवेळी करण्यात आले. मात्र कागदावरील नव्या ठाण्याला प्रत्यक्षात गती कधी मिळेल हा प्रश्न अनुत्तरितच होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशामुळे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या आघाडीवर वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आणि भिवंडीच्या मधोमध असलेल्या खाडीवर तीन नव्या पुलांची उभारणी करण्याचा निर्णय घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. खाडीवरील हे तिन्ही पूल ठाणे आणि भिवंडी या दोन शहरांमधील नव्या शहराच्या निर्मितीला चालना देणारे ठरतील असे नियोजन क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

नवीन ठाण्याची निर्मिती आवश्यक का आहे?

ठाणे महापालिकेचे क्षेत्र घोडबंदरपासून थेट डोंबिवलीलगत असलेल्या शीळ-कल्याण मार्गावरील पलावा संकुलाच्या वेशीपर्यत विस्तारले आहे. या संपूर्ण महापालिका क्षेत्रात बेसुमार अशी बेकायदा बांधकामे गेल्या काही वर्षांत उभी राहिली असली तरी पायाभूत सुविधांच्या आघाडीवर शहर नियोजनासाठी हजारो कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांची उभारणीदेखील या भागात सुरू आहे. ठाणे आणि भिवंडी या दोन शहरांच्या मधल्या टापूच्या नियोजनाला मात्र कोणताही ठोस आकार नाही. याच भागात एक नियोजित शहर उभारता येऊ शकते अशी कल्पना तत्कालीन महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी मांडली होती. एमएमआरडीएनेदेखील घोडबंदर मार्गाहून भिवंडीच्या दिशेने जाताना लागणाऱ्या खारबाव, पायेगाव तसेच आसपासच्या परिसरात काही विकास केंद्राची आखणीही त्यांच्या विकास आराखड्यात करुन ठेवली आहे. याच भागात रोजगार निर्मितीची काही केंद्रे उभारून येथील नागरीकरणाला एक नियोजित रूप देण्याचे प्रस्ताव किमान कागदावर तरी आखले गेले आहेत. या नियोजनला प्रकल्पांची जोड देण्याचे काम आता वेगाने सुरू आहे.

विश्लेषण: मेट्रो मुंबईकरांची नवीन जीवनवाहिनी?

काय आहेत प्रकल्प?

ठाणे येथील घोडबंदर भागातून भिवंडी शहराला थेट जोडता यावे, यासाठी एमएमआरडीएने तीन नवीन खाडी पुलांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याच भागातून ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाची आखणीही करण्यात आली आहे. गायमुख ते पायेगाव, कासारवडवली ते खारबाव आणि कोलशेत ते काल्हेर अशा तीन पुलांचा एमएमआरडीने काढलेल्या निविदांमध्ये समावेश आहे. गायमुख ते भिवंडीतील चिंचोटी येथील पायेगावपर्यंत १.८० किमीचा खाडी पूल असणार आहे. कासारवडवली ते भिवंडीतील खारबावपर्यंत जोडणारा ८०० मीटरचा खाडी पूल असणार आहे. तसेच कोलशेत ते भिवंडीतील काल्हेर हा सुमारे ५०० मीटरचा खाडीपूल असणार आहे. या प्रकल्पांचा विस्तृत प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी एमएमआरडीएने सल्लागार नियुक्तीची निविदा काढली आहे. या प्रकल्पांसाठी १ हजार १६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

प्रकल्पाची गरज का होती?

भिवंडी शहर हे गोदाम आणि वस्त्रोद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. हजारो अवजड वाहने या भागातून गुजरातच्या दिशेने वाहतूक करतात. हलक्या वाहनांचाही भार या मार्गावर अधिक असतो. अनेकदा या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. ही कोंडी कमी करण्यासाठी नवीन खाडी पुलांची उभारणी करणे गरजेचे होते. ठाणे शहराला लागूनच असलेल्या भिवंडी तालुक्यातील खाडीकिनारी भागातील कशेळी-काल्हेर गावांत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात निवासी इमारती उभ्या राहिल्या आहेत. यामुळे या भागाचे झपाट्याने नागरीकरण होण्याबरोबरच वाहनाच्या संख्येत वाढ झाली आहे.

अशाच प्रकारे खारबाव आणि पायेगाव भागातही इमारतींची बांधकामे झाली आहेत. ठाणे शहरापासून कशेळी- काल्हेर परिसरात अवघ्या १५ ते २० मिनिटांत वाहतूक करणे शक्य होत असले तरी काही वेळेस अवजड वाहतुकीमुळे कोंडी होऊन प्रवासासाठी एक तासांचा अवधी लागतो. तर, खारबाव आणि पायेगाव भागात जाण्यासाठी वळसा घालून प्रवास करावा लागत असून त्यासाठी एक ते दीड तासांचा अवधी लागतो. याठिकाणी रेल्वे स्थानके असले तरी ही वाहतूक केवळ भिवंडी रेल्वे स्थानकापर्यंत होते. तसेच ठराविक वेळेतच याठिकाणी रेल्वे वाहतुकीची सुविधा उपलब्ध आहे. या भागांना जोडण्यासाठी नवीन खाडी पुलांची गरज होती.

विश्लेषण : पोलिसांसाठी ‘खबरी’ किती महत्त्वाचे? त्यांच्या ‘बक्षिसा’बाबत उच्च न्यायालयाचा निर्णय काय सांगतो?

या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीची समस्या कशी सुटेल?

ठाणे तसेच भिवंडी शहरातून गुजरातच्या दिशेने अवजड वाहतूक सुरू असते. या वाहतुकीमुळे दोन्ही शहरातील रस्त्यांवर कोंडीची समस्या निर्माण होते. पुलांच्या उभारणीमुळे कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार असून त्याचबरोबर वाहन चालकांचा वेळ आणि इंधनही बचत होणार आहे. खारबाव आणि पायेगाव भागात वळसा घालून करावा लागणार प्रवास टळणार असून हा प्रवास एक ते दीड तासांऐवजी १० ते १५ मिनिटांचा होणार आहे. तसेच घोडबंदर भागातून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहतूकीमुळे घोडबंदर घाटात वाहतूक कोंडी होते. त्याचा परिणाम घोडबंदर आणि ठाणे शहरातील वाहतुकीवर होतो. परंतु नव्या खाडी पुलांमुळे अवजड वाहनांना घाट रस्त्याऐवजी थेट भिवंडीमार्गे गुजरातच्या दिशेने जाणे शक्य होणार आहे. त्यामुळे घोडबंदर घाटात होणाऱ्या कोंडीची समस्या सुटेल. कोंडीमुक्त आणि प्रवास कालावधी कमी होणार असल्याने व्यापाऱ्यांना उद्योगांच्या दृष्टीने हा मोठा दिलासा मिळणार आहे.

या प्रकल्पाचे आणखी काय फायदे होणार?

भिवंडी तालुक्यातील खाडीकिनारी भागातील कशेळी-काल्हेर भागांचे मोठ्याप्रमाणात नागरीकरण झाले आहे. हा परिसर कोलशेत ते काल्हेर खाडी पुलाने घोडबंदर भागाशी जोडला आहे. खारबाव, पायेगाव आणि आसपासच्या भागात इमारती उभारण्यात आला असून यातील घरांची `न्यू ठाणेʼ अशी जाहिरातबाजी करून बिल्डरांनी विक्री केली आहे. सुरुवातीला अनेकांनी येथील घरांचा पर्याय निवडून घरे खरेदी केली. पण, याठिकाणी प्रवासाची पुरेशी सुविधा नसल्याचे समोर येऊ लागताच घर खरेदी मंदावली. या भागात आजही मोठ्या मोकळ्या जमिनी उपलब्ध आहेत. याठिकाणी खाडी पुलाच्या उभारणीची चाचपणी ठाणे महापालिकेने सुरू केली आणि त्यानंतर अनेक बड्या बिल्डरांनी याठिकाणी मोठ्या संकुलांची उभारणी करण्याचा विचार सुरू केला होता. तशी पालिका वर्तुळात चर्चा होती. त्यामुळे नवीन खाडी पूल झाल्यास खाडीकिनारी भागातील कशेळी-काल्हेर, खारबाव, पायेगाव आणि आसपासच्या भागातील जमिनींचे महत्त्व वाढणार असून याठिकाणी नागरीकरणही मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावांना शहरी रूप येण्याची चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New thane development cm eknath shinde orders mmrda print exp pmw
First published on: 06-02-2023 at 09:00 IST