चंद्रशेखर बोबडे
भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या विदर्भात लोकसभा निवडणुकीत या पक्षाचा दणदणीत पराभव झाला. केंद्रात व राज्यात सत्ता, पक्षाचे भक्कम पाठबळ, निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक सर्व साधनसामग्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व असताना पक्षाला या निवडणुकीत अपयश का आले, याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विदर्भ भाजपचा बालेकिल्ला का मानला जातो?

विदर्भ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र भाजपने शिवसेनेच्या मदतीने या भागावर आपली पकड मजबूत केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या भागातील ६६ पैकी चाळीसहून अधिक जागा जिंकल्या होत्या. याशिवाय लोकसभा निवडणुकीतही घवघवीत यश मिळवले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाने मुसंडी मारली होती. त्यामुळे विदर्भाला भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. २०१९ च्या निवडणुकीत मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळाले नव्हते.

२०२४ च्या निवडणुकीत किती जागा लढवल्या?

विदर्भात लोकसभेच्या एकूण १० जागा आहेत. यापैकी भाजपने सात जागा लढवल्या होत्या व तीन जागा मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटासाठी सोडल्या होत्या. भाजपने लढवलेल्या जागांमध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, अमरावती, वर्धा व अकोला अशा सात जागा होत्या. २०१९ मध्ये अमरावती, चंद्रपूर वगळता सर्व जागा भाजपकडे होत्या. नागपूरमधून पक्षाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी, चंद्रपूरमधून विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवले होते. याशिवाय भंडारा-गोंदिया, गडचिरोली, वर्धा येथून विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली होती. अकोल्यात शिरीष धोत्रे हा नवीन चेहरा रिंगणात उतरवला होता तर अमरावतीमधून नवनीत राणा यांना संधी देण्यात आली होती.

आणखी वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म गावी उभारले जाणारे संग्रहालय का महत्त्वाचे मानले जात आहे?

सातपैकी दोनच जागी विजय…

सातपैकी फक्त दोनच जागा या पक्षाला या निवडणुकीत जिंकता आल्या. त्यापैकी एक जागा नागपूर ही हमखास निवडून येणारी होती, तर अकोल्याची जागा भाजपने निसटत्या फरकाने जिंकली. उर्वरित सर्वच ठिकाणी पक्षाचा पराभव झाला. वर्धा, गडचिरोली या दोन्ही ठिकाणी भाजप सलग दोन वेळा निवडून आला होता. मात्र या जागा पक्षाला राखता आल्या नाहीत. अमरावतीमध्ये भाजपने मागच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या व नंतर हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नवनीत राणा यांना उमेदवारी दिली पण त्यांनाही निवडून आणता आले नाही.

२०१९ च्या तुलनेत किती जागांचा फटका?

२०१९ मध्ये भाजप-शिवसेना एकत्रित निवडणुका लढले होते व त्यांनी १० पैकी ९ जागा जिंकल्या होत्या. त्यात सहा जागा भाजपच्या तर तीन जागा शिवसेनेच्या होत्या. यावेळी भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या. चार जागांचा फटका त्यांना बसला. यावेळी उद्धव ठाकरेंच्या ऐवजी भाजपसोबत शिंदे यांची शिवसेना होती. शिंदे गटालाही भाजपने उमेदवार पुरवले, परंतु तेथेही अपयश आले. शिंदेंनी दोन जागा लढवल्या होत्या, त्यापैकी एकच जागा त्यांना जिंकता आली.

आणखी वाचा-भाजपच्या पडझडीमुळे राज्यात एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद आणखी मजबूत झाले?

भाजपचा पराभव का झाला?

वाढती महागाई, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, शेतमालाचे पडलेले भाव या ज्वलंत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून राम मंदिर, हिंदू-मुस्लीम, मंगळसूत्र यासारख्या निरर्थक मुद्द्यांना अग्रक्रम देणे, राजकीय पक्षफोडी करणे, भ्रष्ट नेत्यांना पक्षात प्रवेश करणे आदी बाबी भाजपला या निवडणुकीत भोवल्या. विशेष म्हणजे, नेते व कार्यकर्त्यांना आलेला सत्तेचा अहंगंड लोकांना आवडला नाही व त्यांनी मतपेटीतून आपला राग व्यक्त केला. विदर्भात बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे, उद्योगांचा अभाव आहे. नोकरीसाठी मुलांना पुण्याकडे धाव घ्यावी लागते. उद्योग सुरू करण्याला प्राधान्य देण्याऐवजी भाजपने विरोधी पक्ष फोडणे व तेथील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देणे सुरू केले हे लोकांना पसंत पडले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे व शरद पवार या नेत्यांबाबत मतदारांच्या मनात सहानुभूती निर्माण झाली. त्याचा फटका भाजपला बसलेला दिसतो. मोठ्या प्रमाणात युवकांनी यावेळी भाजपच्या विरोधात मतदान केले. त्याचाही फटका पक्षाला बसला.

पक्षांतर्गत मतभेद कारणीभूत?

भाजपमध्ये प्रत्येक जिल्ह्यात नेत्यांमध्ये मतभेद आहेत. पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असून त्यांना महत्त्व दिले जात नाही, निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही, त्यामुळे अनेकांनी यावेळी निवडणुकीत फक्त दिसण्यापुरतेच काम केले. उमेदवारी देतानाही चुका झाल्या. चंद्रपूरमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती, पण त्यांना रिंगणात उतरवण्यात आले. अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध होता. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचा परिणाम या दोन्ही जागा पक्षाला गमवाव्या लागल्या.