कोल्हापूर : पेट्रोल आणि डिझेलपेक्षा हा एक पर्यावरणपूरक आणि स्वस्त पर्याय आणि कमी प्रदूषणकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीएनजीचे (संकुचित नैसर्गिक वायू – कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) उत्पादन प्रकल्प उभा करण्यास श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी सर्व विषय एकमताने हात उंचावून मंजूर केले. सभेस उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, संचालक, सभासद उपस्थित होते.
कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफआरपीप्रमाणे कारखान्याने ३२०० रुपये प्रमाणे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा केली आहे. साखर उत्पादन, खप व दरामुळे साखर कारखानदारीचे आर्थिक चक्र सातत्याने अडचणीत येत असल्याने साखरेच्या आधारभूत किमतीत वाढ करणे आवश्यक आहे. गत साली ऊस गळीत हंगामा ९८ दिवस चालला. त्या हंगामात १० लाख ७०हजार ७५२ मॅट्रिक टन उसाचे गाळप करून सरासरी साखर उतारा १२.२९ झाला असून ११लाख ६० हजार सातशे क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या एफआरपीप्रमाणे तीन हजार दोनशे रुपये प्रतिटना प्रमाणे बील अदा करण्यात आली आहे. कारखान्यास आज अखेर देश व राज्य पातळीवरील ६९ पुरस्कार मिळाले आहेत. कारखान्याची उपप्रकल्पही चांगल्या प्रकारे सुरू असून कारखान्याने सर्व प्रकारची देणी ज्या त्या वेळी अदा करण्यात आली आहेत.कारखान्याच्या आर्थिक स्थिती चांगली आहे.
पूरग्रस्तांना मदत
मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील म्हणाले, दत्त कारखान्याने ऊस उत्पादकांचे हित करताना नेहमीच एकरकमी एफआरपी दिली आहे. सभासदांचा ऊस वेळेत गाळप करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील राहील. कारखान्याच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदत केंद्राची स्थापना करण्यात येणार असून, ती लवकरच पूरग्रस्तांना पोहोच केली जाईल. गणपतराव पाटील यांनी महापूर गस्त नागरिकांना आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले. त्यास रावसाहेब पाटील (कवठेगुलंद) यांनी रोख पाच हजार रुपये देऊन गणपतराव पाटील यांना प्रतिसाद दिला. मदतीचा ओघ लगेचच सुरू झाला.
दुसऱ्या हप्त्याची मागणी
गेल्या ऊस गळीत हंगामात साखर उद्योगाला चांगली प्राप्ती झाली असल्याने दत्त कारखान्याने प्रतिटन ५०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा, अशी मागणी आंदोलन अंकुश या संघटनेचे धनाजी चुडमुंगे व सहकाऱ्यांनी सभेत लावून धरली.
या सभेस कारखान्याचे उपाध्यक्ष शरदचंद्र फाटक, अरुण कुमार देसाई, श्रीमती विनया घोरपडे, अनिलराव यादव, रणजीत कदम, बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगु गावडे, ज्योती कुमार पाटील, सिद्ध गोंडा पाटील, सौ संगीता पाटील,सौ अस्मिता पाटील, ईदजीत पाटील, महेंद्र बागे, विजय सुरवंशी, प्रदीप बनगे, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पृथ्वीराज सिंह यादव, अरुणराव इंगवले, यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.